सिंधुदुर्गमधील चार युवक बनले स्कुबा डायव्हिंग इन्स्ट्रक्टर, अंदमानमध्ये पूर्ण केले प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 11:49 AM2024-05-14T11:49:21+5:302024-05-14T11:49:50+5:30
जिल्ह्याच्या स्कुबा डायव्हिंग क्षेत्रात मानाचा तुरा
संदीप बोडवे
मालवण : सिंधुदुर्गच्या स्कुबा डायव्हिंग क्षेत्रात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्कुबा डायव्हिंग क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण असा समजला जाणारा ‘स्कुबा डायव्हिंग इन्स्ट्रक्टर’ बनण्याचा मान सिंधुदुर्गमधील चार युवकांनी प्राप्त केला आहे.
एमटीडीसीच्या मालवण येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वाटिक स्पोर्ट्स अर्थात, इसदाच्या स्थापनेपासून येथील युवकांना स्कुबा डायव्हिंगमधील विविध प्रकारचे प्रशिक्षण स्थानिक पातळीवर मिळणे शक्य झाले आहे. इसदामध्ये प्रशिक्षण घेऊन येथील अनुभवाच्या जोरावर सिंधुदुर्गमधून काही मोजकेच स्कुबा ड्रायव्हिंग प्रशिक्षक तयार झाले आहेत. यात स्कुबा प्रशिक्षकांमध्ये ऋतुज देऊलकर (मालवण), विवान राणे (कणकवली), अंतोन काळसेकर (मालवण), नारायण पराडकर (निवती) या युवकांची भर पडली आहे.
अंदमानमध्ये केले प्रशिक्षण पूर्ण..
स्कुबा डायव्हिंगमधील प्राथमिक प्रशिक्षण आणि डाइव्ह मास्टरपर्यंतचा टप्पा पूर्ण केल्यानंतर स्कुबा प्रशिक्षकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी व त्याची परीक्षा देण्यासाठी अंदमानमध्ये व्यवस्था आहे. स्कुबा डायव्हिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय मानांकित पॅडी या संस्थेच्या विशेष प्रशिक्षकाद्वारे या कोर्सचे परीक्षण केले जाते.
दर्जेदार स्कुबा डायव्हर्स बनतील
स्कुबा डायव्हिंगमधील प्रशिक्षणार्थींना हाताळण्याबरोबरच ओपन वॉटर, ॲडव्हान्स ओपन वॉटर, इमर्जन्सी फर्स्ट रिस्पॉन्डट आणि ड्राइव्ह मास्टरपर्यंतचे प्रशिक्षण देण्यासाठी स्कुबा इन्स्ट्रक्टरला तयार करण्यात येते.
एसओपी तयार करण्यात होईल मदत..
सिंधुदुर्गमधून मोठा अनुभव बाळगून दर्जेदार असे स्कुबा प्रशिक्षक तयार होत आहेत. या स्कुबा प्रशिक्षकांसोबत काम करून पर्यटन संचलनालय आणि महाराष्ट्र सागरी मंडळाने सिंधुदुर्गच्या किंबहुना महाराष्ट्राच्या जलपर्यटनासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केल्यास जिल्ह्याच्या सागरी पर्यटनास मोठा फायदा होऊ शकतो, असे मत पर्यटन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
आता इसदामध्ये मिळणार ॲडव्हान्स प्रशिक्षण
पुढील वर्षापासून इसदामध्ये स्कुबा डायव्हिंगसोबतच स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षक, पावर बोट हँडलिंग, जेट स्की, लाइफ सेव्हिंग टेक्निक यांचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. एमटीडीसीच्या या प्रशिक्षण उपक्रमाचा स्थानिकांना मोठा फायदा होईल. - सूरज भोसले, व्यवस्थापक इसदा, मालवण.