एका संकरित जातीसाठी शास्त्रज्ञांच्या टीमचं चौदा वर्षांचं तप!
By admin | Published: January 14, 2015 09:53 PM2015-01-14T21:53:38+5:302015-01-14T23:21:34+5:30
चौदा वर्षात शरीर, बुध्दी आणि मनाने न थकता शास्त्रज्ञ हे संकरण तयार करतो.कोकणसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ मिळाले आणि या विद्यापीठात संशोधनाचं काम सुरू
विहार तेंडुलकर - रत्नागिरी -कोकणातील पिकपाण्यात आता वृध्दी होऊ लागली आहे. शेतीत नवनवीन प्रयोग झाल्याने, विशेषकरून संकरित जातींमुळे उत्पादनाचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही पिकाची संकरित जात आता सहज मिळते. पण, त्यामागे कष्ट उपसणाऱ्या शास्त्रज्ञांची बुध्दी आणि श्रम कोणीही विचारात घेत नाही. एक संकरित जात तयार करण्यासाठी लागणारा कालावधी १४ वर्षे एवढा असतो आणि या चौदा वर्षात शरीर, बुध्दी आणि मनाने न थकता शास्त्रज्ञ हे संकरण तयार करतो.कोकणसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ मिळाले आणि या विद्यापीठात संशोधनाचं काम सुरू झालं. अनेक फळे, फुले, पिके यांचं संकरण याठिकाणी केलं जाऊ लागलं. संकरित जातींनी शेतकऱ्यांच्या हृदयाचा केव्हाच ठाव घेतला आहे. उत्पादन घेताना शेतकरी ज्याप्रमाणे राबतो, त्याचप्रमाणे शास्त्रज्ञही शेतकऱ्यांच्या हातापर्यंत नवे संकरित बियाणे पोहोचवण्यासाठी राबत असतो. बुध्दीने, हाताने आणि मनानेही! संकरित जात निर्माण करायची झाल्यास, सुरुवातीला विचार करावा लागतो तो येथील माती, येथील हवामान आणि याठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेचा! याचा विचार करून विद्यापीठात उपलब्ध असणाऱ्या त्या-त्या प्राकृतिक रचनेशी जुळणाऱ्या पिकांच्या जाती संकरणासाठी निवडल्या जातात.
कोकण कृषी विद्यापीठात आताच्या घडीला असे तीनशे वाण आहेत. कोकण विभागापासून ते राज्य, देश, आंतरराष्ट्रीय अशा विविध पातळ्यांवरुन हे वाण आणण्यात आले आहेत. त्यामुळे कोकणात न होणारे पीक घ्यायचे असल्यास, येथील हवामानाशी जुळवून घेतील, अशा पिकाचे वाण या तीनशे वाणांमधून शोधून काढले जातात आणि त्यांच्यात संकरण केले जाते. कमी उंचीच्या, उत्पन्न चांगल्या देणाऱ्या, उत्पन्नापेक्षा चारा जास्त देणाऱ्या, हळव्या जातीच्या, गरव्या जातीच्या अशा विविध प्रकारच्या जाती तयार करताना त्या त्या वाणांचे संकरण केले जाते.
वाणाचं संकरण झालं की, वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात. या वाणाच्या जवळपास सात पिढ्या तयार झाल्यानंतर शुध्द वाण मिळते. एक पिढी तयार होण्यासाठी एक हंगाम लागतो. बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या असते. पण, विद्यापीठ परिसरात पाण्याची पुरेशी सोय केलेली असल्याने एका वर्षात दोन हंगामात दोन पिढ्या अशी चाचणी घेतली जाते. तीन वर्षात सहा पिढ्या झाल्या की, सातवी चाचणी घेतली जाते आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने संकरित जातीवर ‘शुध्द बियाणे’ म्हणून शिक्कामोर्तब होण्याकडे प्रवास सुरू होतो. हे वाण तयार झाल्यानंतर ते विविध कमिट्यांकडून चाचणीसाठी सुयोग्य समजले जाते. एखादे संकरित बियाणे तयार करताना फार सोपे वाटते. मात्र, त्यामागे असलेल्या शेकडो शास्त्रज्ञांचे श्रम हे कल्पनेपलीकडचे असतात. कमी श्रमात जास्त पीक देणाऱ्या या बियाण्यांच्या मागे किती हात, किती मेंदू आहेत, याची कल्पनाही नसते. पण, कित्येक वर्षांच्या श्रमानंतर एक बियाणे तयार होते, हे ऐकल्यानंतर नक्कीच थक्क व्हायला होईल.++
चाचणीही ठरते महत्त्वाची
केवळ दाणे तयार झाले म्हणजे संकरित जात ‘ओके’ झाली, असे होत नाही, तर त्यानंतर त्याची चाचणी केली जाते. पहिल्या फेरीत याचा अहवाल होकारार्थी आला, तर दुसऱ्या फेरीत ज्या दोन जाती या संकरणासाठी वापरण्यात आल्या आहेत, त्यापेक्षा ही जात वेगळी आहे की नाही, याची तपासणी केली जाते.
कमिट्यांकडून देखरेख
केवळ बियाणे तयार झाले, म्हणजे झाले असे होत नाही, तर विद्यापीठाच्या कमिटीकडे या बियाण्याची शिफारस केली जाते. राज्याच्या बियाणे कार्यशाळेव्दारे बियाण्याची चाचणी घेतल्यानंतर चार कृषी विद्यापीठांच्या तज्ज्ञांसमोर सादरीकरण होते. त्यानंतर मंत्रालय सचिवांच्या कमिटीसमोर सादरीकरण होते. त्यांच्याकडून बियाण्याबाबतचा प्रस्ताव देशपातळीवर जातो आणि त्यांच्या शिफारसीनंतर गॅझेटमध्ये नोंद होते.
कमिट्यांकडून देखरेख
केवळ बियाणे तयार झाले, म्हणजे झाले असे होत नाही, तर विद्यापीठाच्या कमिटीकडे या बियाण्याची शिफारस केली जाते. राज्याच्या बियाणे कार्यशाळेव्दारे बियाण्याची चाचणी घेतल्यानंतर चार कृषी विद्यापीठांच्या तज्ज्ञांसमोर सादरीकरण होते. त्यानंतर मंत्रालय सचिवांच्या कमिटीसमोर सादरीकरण होते. त्यांच्याकडून बियाण्याबाबतचा प्रस्ताव देशपातळीवर जातो आणि त्यांच्या शिफारसीनंतर गॅझेटमध्ये नोंद होते.
शास्त्रज्ञांची फौज
कृषीविषयक अनेक बाबींवर कोकण कृषी विद्यापीठ संशोधन करत आहे. विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध शाखांमध्ये मिळून ७०० ते ८०० शास्त्रज्ञ आहेत.
उत्पादनात सुधारणा
पूर्वी ज्या काळात संकरित बियाणे तयार करण्यासाठी १४ वर्षे लागत होती, त्यावेळी त्याचे मिळणारे निकालही फारच कमी होते. शास्त्रज्ञ ज्यावेळी हे वाण तयार करण्यास सुरुवात करतो, त्यावेळी तो स्थिती ध्यानी घेऊन तो हे वाण तयार करत असतो. मात्र १४ वर्षानंतर निसर्गात अनेक प्रकारचे बदल होतात. त्यामुळे या संकरित जाती प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात पडेपर्यंत, ती निरूपयोगी ठरत असे. पण आता ७ ते ८ वर्षांतच नवीन वाण तयार करणे शक्य आहे.
एखादे संकरित वाण तयार करायचे झाल्यास त्याच्या प्राथमिक अवस्थेपासून ते अगदी शेतकऱ्यांच्या हातात पडेपर्यंत १४ वर्षे लागतात. गेल्या काही वर्षांत यामध्ये सुधारणा झाल्यामुळे ७ ते ८ वर्षांत हे वाण शेतकऱ्यांच्या हाती पडते. पण, आमचे शास्त्रज्ञ इतकी वर्षे न थकता तपश्चर्या करतात आणि हे वाण तयार करतात. मी स्वत: विविध ११ संकरित जाती तयार केल्या आहेत.
- भारत वाघमोडे,
प्रभारी अधिकारी, भुईमूग सुधार