चौदा वर्षे वनवासाची; कोसबीत यंदा होळी उत्साहाची!-

By admin | Published: March 4, 2015 09:48 PM2015-03-04T21:48:38+5:302015-03-04T23:40:20+5:30

तंटामुक्त अभियान-- गावामध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवण्यात येत असताना ग्रामस्थांच्या सहकार्याने गेली ३५ वर्षे दारूबंदी कायम आहे. गुटखाबंदी आहे. गाव छोटे -राजकारण नाही.

Fourteen years of exile; Holi enthusiasm this year! | चौदा वर्षे वनवासाची; कोसबीत यंदा होळी उत्साहाची!-

चौदा वर्षे वनवासाची; कोसबीत यंदा होळी उत्साहाची!-

Next

मेहरून नाकाडे -रत्नागिरी  -- ग्रामदेवतेच्या मानपानावरून गेली १४ वर्षे असलेला वाद मिटविण्यात कोसबी गावातील तंटामुक्त समितीला यश आले आहे. गेल्यावर्षी शिमगोत्सवाच्या दोन दिवस आधी हे वाद मिटवण्यात आले होते. त्यामुळे गतवर्षी शिमगोत्सव गोड झाला. परंतु यावर्षी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिमगोत्सव व पालखी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. अचानकच्या निर्णयामुळे गतवर्षी मुंबईकर व अन्य मंडळी शिमगोत्सवात सहभागी होऊ शकली नव्हती. यावर्षी मोठ्या संख्येने भाविक मंडळी शिमगोत्सवात सहभागी होऊन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.
गावातील तंटे सामोपचाराने गावपातळीवर मिटवून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू झाले. गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखणे तंटामुक्त समितीचे कर्तव्य आहे. त्याच अनुषंगाने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष के. डी. कदम यांनी पुढाकार घेत सामोपचाराने व सर्वानुमते गावातील वाद मिटविले. शिवाय १४ वर्षे ग्रामदेवता श्री जाखमातेच्या मानपानावरून असलेला वाद मिटवत शिमगोत्सव उत्साहात साजरा करण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले. त्यानुसार वाद बाजूला ठेवून ग्रामस्थ शिमगोत्सवात सहभागी झाले आहेत. गतवर्षी होळीच्या दोन दिवसापूर्वी निर्णय झाल्याने शिमगोत्सव आनंदाने साजरा झाला होता. मात्र, यावर्षी सर्व ग्रामस्थ मंडळींनी एकत्रित येऊन उत्सवाचे नियोजन केले आहे. त्यामुळे मुंबईकर भाविकही मोठ्या संख्येने गावात दाखल झाले आहेत.
चिपळूण तालुक्यातील कोसबी गावाची लोकसंख्या ८०२ इतकी असून, ११ वाड्यांमध्ये गाव विखुरलेला आहे. गावाला (२०१३-१४) चा तंटामुक्त पुरस्कार जाहीर झाला आहे. तंटे गावपातळीवरच मिटविण्यात समिती कार्यरत आहे. शिवाय सातत्याने गावामध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तंटामुक्त समितीतर्फे आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी आदी आरोग्यविषयक कार्यक्रमांबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, विद्यार्थी गुणदर्शन, गुणवत्ताधारक विद्यार्थी गौरव, याशिवाय समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली काळे, महाविद्यालयीन प्राध्यापक, अन्य गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांना पाचारण करून वेळोवेळी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.स्वच्छता अभियान राबवित असताना वाडीवार कचराकुंड्या बसवण्यात आल्या आहेत. शिवाय ग्रामस्थांमध्ये स्वच्छता राखण्याविषयी जागृती करण्यात येत आहे. गावामध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवण्यात येत असताना ग्रामस्थांच्या सहकार्याने गेली ३५ वर्षे दारूबंदी कायम आहे. गुटखाबंदी करण्यात आली आहे. गाव छोटे असले तरी संपूर्ण गावामध्ये राजकारणाला वाव दिलेला नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ग्रामस्थ सहभागी होत असले तरी गावामध्ये गाव पॅनलचेच वर्चस्व अबाधित आहे.


पहिल्यांदा मिळाला मान
कोसबी ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थापनेपासून बिनविरोध होत आहेत. २०१०ची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर पहिल्यांदा महिला सरपंच म्हणून मला संधी मिळाली. आता निवडणूक जाहीर झाली असून, तीही बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- श्रध्दा गुजर,
सरपंच - ग्रामपंचायत, कोसबी

शिमगोत्सवासाठी उत्साह
कोसबी गावामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने राहात आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदेशानुसार गावात जातीयतेला थारा नाही. शिमगोत्सव असो वा गणेशोत्सव सर्व धर्मिय मंडळी एकत्र येऊन साजरा करतात. ग्रामदेवता श्री वाघजाईच्या मानापानावरून असलेले वाद मिटविण्यात यश आले असून, ग्रामस्थांच्या सहकार्यानेच गावात सण उत्साहात साजरा केला जाणार आहे.
- के. डी. कदम,
अध्यक्ष, तंटामुक्त समिती


बंदोबस्ताशिवाय उत्सव
गावामध्ये ग्रामसुरक्षा दल कार्यरत असून, उत्सवाच्या वेळी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असते. शिवाय पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असल्याने पोलीस बंदोबस्ताशिवाय उत्सव साजरा केला जातो. पेट्रोलिंगसाठी पोलीस गावात येऊन जात असले तरी उत्सवासाठी खास बंदोबस्त ठेवला जात नाही.
- विलास सावंत,
पोलीसपाटील, कोसबी

Web Title: Fourteen years of exile; Holi enthusiasm this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.