चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Published: February 20, 2015 10:17 PM2015-02-20T22:17:08+5:302015-02-20T23:13:52+5:30
केवळ आश्वासनच : मुंबईतील राज्यव्यापी धरणे आंदोलनाची तयारी
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, आश्वासनाशिवाय पदरी काहीच न पडल्याने आता या कर्मचाऱ्यांनी येत्या ४ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, शासकीय सेवाकाळात मृत्यू पावल्यास कर्मचाऱ्याच्या पाल्यास अथवा पत्नीस विनाअट सेवेत सामावून घ्यावे, शासकीय सेवा करत असताना काही कारणास्तव सेवा करणे शक्य होत नसल्यास त्याच्या पाल्यास सेवेत सामावून घेणे, प्रदीर्घ काळापासून बदली कर्मचारी म्हणून शासनाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यास शासकीय सेवेत कायम करणे, गणवेशासाठी २५०० रूपये मंजूर करण्यात यावेत. ग्रेड पे मध्ये बदल करावा, आदी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी राज्य कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष एम. एम. पठाण व त्यांच्या सहकारी राज्य संघटनेवरील सर्व कार्यकारिणी यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे अखेर शासनाने या कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता मंजूर केला आहे. मात्र, उर्वरित मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी मध्यवर्ती संघटनेने वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्याच्या पूर्ततेच्या दृष्टीने कुठलीच हालचाल शासनस्तरावर झालेली नाही. त्यामुळे आता या सर्व कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरावर पुन्हा आंदोलन करण्याची तयारी केली आहे. ४ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या राज्यस्तरीय ठिय्या आंदोलनासाठी राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)