चौपदरीकरणात हातखंब्याला ‘टाटा’?
By Admin | Published: June 9, 2015 11:05 PM2015-06-09T23:05:58+5:302015-06-10T00:29:49+5:30
पालीसाठी नवा डाव : रत्नागिरीकरांतून तीव्र पडसाद उमटणार!
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी जमीन मोजणी प्रक्रिया सुरू असताना पाली बाजारपेठेतून रस्ता कसा नेणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, निवळीजवळून पालीपर्यंत वेगळा मार्ग काढून तेथून चौपदरीकरण करावे, असा नवा प्रस्ताव काही राजकारण्यांनी शासनापुढे ठेवला आहे. त्यामुळे चौपदरीकरणात हातखंब्याला ‘टाटा’ करीत रत्नागिरीवर सूड उगवला जाणार काय, असा सवाल निर्माण झाला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा गेल्या दोन दशकांपासूनचा प्रलंबित विषय हाती घेतला असून, इंदापूर ते झाराप मार्गाचे कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ४२०० कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना जागा मोजणी करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात मोजणीचे काम ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात हेच काम ९५ टक्केपर्यंत पूर्ण झाले आहे.
तालुक्यातील पाली बाजारपेठेतून चौपदरीकरण झाले तर बाजारपेठ स्थलांतरीत होण्याचा धोका आहे. त्यामुळे पालीला समांतर जागेतून बाहेरच्या बाजूने चौपदरीकरणासाठी रस्ता बनवावा, असा प्रस्ताव पुढे आला होता. त्याबाबत अधिकारी अभ्यास करीत आहेत. त्याचदरम्यान काही राजकीय नेत्यांकडून पाली बाजारपेठेला चौपदरीकरणातून वाचवण्यासाठी भलताच पर्याय पुढे आणला गेला आहे. निवळी ते हातखंबा दरम्यान मधूनच आतल्या बाजूने असलेल्या मोकळ्या जागेतून चौपदरी रस्ता वळवून तो थेट पाली बाजारपेठेच्या पुुढे मुख्य रस्त्याला जोडावा, असा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावामुळे रत्नागिरीला जोडणारा हातखंबा हा महत्त्वाचा पार्इंटच मिसिंग होणार आहे. परिणामी त्याचा रत्नागिरीच्या विकासावरही परिणाम होणार आहे. हा प्रस्ताव उपयुक्त किती, हा वेगळा प्रश्न आहेच. मात्र, या प्रस्तावाप्रमाणे निवळीजवळून थेट पाली जोडणारा पर्याय स्विकारला गेल्यास तो रस्ता १५ किलोमीटर्सचा होईल. या भागातून रस्ता नेण्यामागे अन्य काही हेतू तर नाहीना, जागा विकासाचा हेतू तर नाहीना, असे सवाल आतापासूनच केले जात आहेत. (प्रतिनिधी)
रत्नागिरी-कोल्हापूरचेही होणार चौपदरीकरण
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाबाबतचा विषय सुरू असतानाच रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर महामार्ग चौपदरीकरणही केले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्तावही तयार झाला आहे. हा मार्ग तर हातखंब्यातूनच जाणार आहे. त्याला डायव्हर्शन करता येणार नाही. हा मार्ग पुन्हा पालीतूनच जाणार असल्याने मुंबई-गोवा महामार्ग निवळीजवळून थेट पालीला जोडण्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात शक्य होणारा नसल्याचे अभियंत्यांकडूनही सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही मार्ग हे मूळ मार्गावरूनच नेताना पाली बाजारपेठेच्या ठिकाणी मार्गबदल होऊ शकतो, असेच सध्यातरी चित्र आहे.
मोजणीत रत्नागिरीची सिंधुदुर्गला मदत
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी जमीन मोजणीचे काम रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक झाले आहे. मोजणीच्या कामात सिंधुदुर्ग जिल्हा पिछाडीवर असल्याने रत्नागिरीतील महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांना सिंधुदुर्गमधील कुडाळ येथे जमीन मोजणी कामगिरीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी आघाडीवर आहे.