चौपदरीकरण, भूसंपादनाचे काम फेब्रुवारीपर्यंत
By admin | Published: October 19, 2015 10:42 PM2015-10-19T22:42:26+5:302015-10-19T23:50:01+5:30
अनंत गीते : ‘तीन-ए’चे प्रस्ताव शासनाकडे दाखल
रत्नागिरी : चौपदरीकरणाबाबत रत्नागिरी, संगमेश्वर आणि चिपळूण या तीन तालुक्यांचे ‘तीन ए’ चे प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आले असून, या तालुक्यांकरिता दिल्लीहून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. आता राजापूर, लांजा या दोन तालुक्यांचे ‘तीन ए’ चे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्याचीही अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल. ‘तीन डी’ ची प्रक्रिया झाल्यावर फेब्रुवारीअखेर चौपदीकरणाच्या भूसंपादनाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची त्रैमासिक बैठक आज गीते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याबाबतची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केंद्र शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या ग्रामविकास योजनांचा आढावा घेण्यात आल्याचे गीते यांनी सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यात केंद्र सरकारच्या योजना चांगल्या रितीने राबवल्या जात आहेत. खासदार निधी १०० टक्के खर्च झाला असून, वाढीव खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे विकासाची कामे मार्गी लागली आहेत. जिल्ह्यात कुठल्याही रोगाची साथ नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
आज राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानसंदर्भात स्वतंत्र बैठक झाली. पुढच्या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पेयजल योजना ही अतिशय महत्वाची योजना आहे. या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असली तरी लवकरच ही योजना पुन्हा सुरू होणार आहे. केंद्र सरकारचे उपक्रम भविष्यातही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंदिरा आवासचे कामही समाधानकारक असल्याचे गीते यांनी सांगितले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मोठा निधी आणण्याचा प्रयत्न असून, यात राज्य महामार्ग आणि जिल्हा महामार्गाचा समावेश असल्याचे गीते यांनी सांगितले. ग्रामसडक योजनेचे १२ टप्पे पूर्ण झाले असून, पहिल्या टप्प्यात २६६ किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या अपग्रेडेशनसाठी प्रस्तावही मंजूर झाला आहे. मात्र, केंद्राचा निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात अपग्रेडेशनचे रस्ते घेण्यात यावेत, अशी मागणी सरकारकडे करण्यात आल्याची माहितीही गीते यांनी दिली.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जगदीश राजापकर, अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना गीते याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे सांगत त्या मुद्द्यांना बगल देत असल्याचे दिसून येत होते. कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या मुद्द्यावर गीते यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले की, पाणी हा महत्त्वाचा विषय आहे. दुर्दैवाने कोकणात यावर्षी पाऊसही कमी झाला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. हे खरं असलं तरी याबाबतचा निर्णय शासनस्तरावर न झाल्याने हा मुद्दा वादाचा विषय बनू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संयुक्तिक खातेदारांची आंबा नुकसानाची भरपाई रखडली आहे. याप्रकरणी संमतीपत्राची अट रद्द करून हमीपत्र स्वीकारले जावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. या मागणीला तत्वत: मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात राज्य शासनाकडून याबाबतचा अध्यादेश काढला जाईल, अशी माहिती रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार राऊत यांनी यावेळी दिली.
देशात महागाई वाढली आहे. तितकीच देशाची सुरक्षितताही महत्त्वाची आहे. यादृष्टीने पाकिस्तान हा देशाचा शत्रू आहे. त्यामुळे त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र, याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे गीते यांनी सांगितले.येथील बहुतांश भाग खाडीव्याप्त असल्याने पुलाची आवश्यकता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे.