राजीव शुक्ला यांच्या नावानेही फसवणूक

By admin | Published: January 30, 2017 11:25 PM2017-01-30T23:25:57+5:302017-01-30T23:25:57+5:30

संतोषच्या फसवणुकीचे कारनामे उघड

Fraud in the name of Rajiv Shukla | राजीव शुक्ला यांच्या नावानेही फसवणूक

राजीव शुक्ला यांच्या नावानेही फसवणूक

Next



रत्नागिरी : खासदारांच्या नावाचा गैरवापर करून शासकीय कार्यालयांची फसवणूक करणाऱ्या संतोष दगडू नारायणकर (मूळ राहणार बीड, सध्या राजस्थान अलवार) याचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. त्याने केवळ खासदार अजय संचेती यांचेच नाही, तर राज्यसभेचे खासदार राजीव शुक्ला यांच्या नावानेही मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाची फसवणूक केली आहे. नारायणकर हा बीड येथील एका राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.
संतोष नारायणकर याने १५ मार्च २०१६ रोजी खासदार अजय संचेती यांच्या लेटरहेडवरील पत्र रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाला ई-मेल केले. खेड साखरोली गावाच्या १० कामाची सुमारे १ कोटी ७० लाख रुपयांची निविदा त्यातून पाठविली होती. ही निविदा बरोबर आहे का, याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने संचेती यांच्या कार्यालयाकडे ई-मेलद्वारे विचारली. त्यावेळी हा सर्व प्रकार बोगस असल्याचे उघड झाले. अजय संचेती यांच्याकडून कुठल्याही प्रकारची निविदा पाठविलेलीच नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले. त्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे संशोधन सहायक शांताराम देशमुख यांच्या लक्षात आले. त्यांनी ५ एप्रिल २०१६ रोजी शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आलेला मेल हा ईरसोनी २००९ या जीमेल अकाऊंटवरून आल्याची माहिती पुढे आली.
हा ई-मेल अकाऊंट ज्याचा आहे, त्या सोनी नामक व्यक्तीचा संतोष नारायणकर याच्याशी संबंध असल्याचे तपासात पुढे आले. त्यासाठी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांचे एक पथक राजस्थान येथे रवाना केले होते. या पथकाने सापळा लावून संतोषला अटक केली. संतोष हा मूळ बीडचा आहे. राजकारणाची पुरेपूर माहिती त्याला होती. या माहिती आधारेच त्याने हा प्रकार केला असल्याचे तपासातून पुढे आले. संतोषने राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांच्या नावेही ४ कोटी रुपयांच्या कामाची निविदा मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली आहे. संतोषचे आणखीही काही कारनामे यातून उघड होऊ लागले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Fraud in the name of Rajiv Shukla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.