Sindhudurg: नोकरीच्या आमिषाने १६.४७ लाखांचा गंडा, कोल्हापूरच्या तोतया पोलिसाचे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 01:05 PM2024-07-23T13:05:05+5:302024-07-23T13:07:57+5:30
सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
ओरोस : स्वतः पोलिस अधिकारी असल्याचा बनाव करून पोलिस भरतीमध्ये काम करतो आणि राज्य गुप्तवार्ता आणि शिपाई पदावर लावतो असे आमिष दाखवून तब्बल १६ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम लाटली. त्या व्यक्ती विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बळवंत गुरव (३९,रा. संस्कार बंगला, शांती उद्यान, आपटेनगर, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे; मात्र तक्रारदार यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
संशयित संदीप गुरव याने आपण पोलिस खात्यात अधिकारी असून आपण पोलिस भरतीत राज्य गुप्तवार्ता आणि पोलिस शिपाई पदावर लावतो असे सांगून भरतीचे आमिष दाखवून १० जानेवारी २०२३ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत तक्रारदाराकडून आंबोली, ओरोस आणि कोल्हापूर येथून वेळोवेळी लाखो रुपये गोळा केले.
यात संशयिताने तक्रारदाराकडून तब्बल १६ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम गोळा केली; मात्र आपले काम होत नसल्याने आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे गाठून आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार संशयित संदीप गुरव याच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमिषाला बळी पडू नका जर असे आपल्या सोबतही घडले असेल किंवा आपल्याला निदर्शनास येत असेल तर तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. - मनीष कोल्हटकर, प्रभारी अधिकारी, सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे.