३00 आकाश कंदिलांचे मोफत वाटप
By admin | Published: November 8, 2015 11:17 PM2015-11-08T23:17:31+5:302015-11-08T23:35:49+5:30
तिसरे वर्ष : खांबाळे केंद्रशाळेचा पर्यावरणपूरक उपक्रम
वैभववाडी : पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतल्याप्रमाणे खांबाळे केंद्रशाळेचे विद्यार्थी व शिक्षकांनी याहीवर्षी इको फ्रेंडली आकाशकंदील बनवून गावात घरोघरी मोफत वाटले आहेत. एकसारख्या सुमारे ३00 कागदी आकाश कंदीलांमुळे दिपावलीच्या निमित्ताने एकप्रकारे समानतेचा संदेशही विद्यार्थ्यांमार्फत केंद्र शाळेने ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेत पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून गावात मोफत वितरणाचे यंदाचे सलग तिसरे वर्ष आहे.
दिवाळीत मुलांचे लक्ष असते ते फराळ, फटाके, कपडे आणि आकाशकंदीलाकडे! अर्थिक स्थिती काहीही असली तरी दिवाळीत सर्रास शहरातील प्रत्येकाच्या दारात आकाश कंदील झुलताना दिसतोच. त्यामुळे विविध आकार आणि प्रकारांच्या आकाश कंदिलांनी प्रत्येक बाजारपेठ किंबहुना गावागावातील मोठी दुकाने सजलेली दिसतात.
दुकानांबाहेर झुलणारे कंदील आपल्या तसेच शेजारच्या घराच्या दरवाजाबाहेर विद्युत प्रकाशात उजळून निघतात तेव्हा चिमुकली एकप्रकारे आकाश कंदिलांच्या मुल्यमापनात गढून जातात. दारात कितीही मोठा आकाश कंदील असला तरी रस्त्यावरील कंदील पाहण्याचा चिमुकल्यांचा आनंदच निराळाच! परंतु ग्रामीण भागात आकाश कंदिलांचे प्रमाण तसे कमीच असते.
बाजारपेठतील आकाश कंदील प्लास्टिकचे असल्याने ते पर्यावरणाला बाधा निर्माण करणारे ठरतात. त्यामुळे खांबाळे केंद्र शाळेचे मुख्याध्यापक संजय रासम यांनी दोन वर्षांपूर्वी त्यांनी कार्डशीट पेपर आणि रंगीत घोटीव कागद आणून विद्यार्थ्यांना रासम यांनी आकाश कंदिल बनविण्याचे प्रशिक्षण दिले. तेव्हापासून गेली तीन वर्षे ते शाळातील विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने पर्यावरण पूरक कागदी आकाश कंदील बनवून गावात घरोघरी देत आहेत. दरवर्षी आकाश कंदिलांची संख्या वाढत असून या वर्षी ३00 कंदिल बनविले असून प्रत्येक घरात त्यांचे वितरण केले आहे.
या उपक्रमात रासम यांना केंद्र्रप्रमुख संतोष गोसावी, प्रशांत रासम, दीपा टक्के, उत्तम पाटील, अस्मिता सुतार व अंगणवाडी सेवकांचे सहकार्य लाभले.
खांबाळे केंद्र शाळेच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. (प्रतिनिधी)
प्रत्येकाकडे एकसमान कंदील
पर्यावरणपूरक आकाश कंदील गावात वाटप केल्याने प्रत्येकाच्या दारात एकसमान कंदील दिसत असल्याने पर्यावरण संवर्धनाप्रमाणेच कंदिलांतून दिसणाऱ्या ‘अमिरी गरीबी’तील अंतर कमी होऊन समानतेचा संदेशही गावात पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.