कोविड रुग्णांना घरापासून ते कोविड सेंटरपर्यंत मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 02:14 PM2021-04-24T14:14:27+5:302021-04-24T14:27:47+5:30
Coronavirus Kankavli Sindhudrug : शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण व कोविड आजाराने मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास विचारात घेत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली शहरातील रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.यात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना घर ते रुग्णालय अथवा कोविड सेंटर वर जाण्यासाठी वाहन व्यवस्था केली जाणार आहे.
कणकवली : शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण व कोविड आजाराने मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास विचारात घेत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली शहरातील रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.यात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना घर ते रुग्णालय अथवा कोविड सेंटर वर जाण्यासाठी वाहन व्यवस्था केली जाणार आहे.
कोविड मृत रुग्ण आणण्यासाठी शववाहिनी उपलब्ध करून दिली जाणार आहे.कोविड पॉझिटिव्ह तसेच कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची परवड होऊ नये यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे श्री.नलावडे म्हणाले. याबाबतची अंमलबजावणी देखील गेले चार दिवसापासून सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
👉कोविड पॉझिटिव्ह मृत रुग्णाला जिल्हा रुग्णालय किंवा शिरवल, हरकूळ बु. येथील कोविड सेंटरमधून कणकवली येथील स्मशानभूमीत आणण्यासाठी खाजगी रुग्णवाहिकेकडून सुमारे 10 ते 15 हजार रुपयांची मागणी केली जाते. तसेच कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्याकरिता रुग्णवाहिकेचे वारेमाप भाडे घेतले जाते.
कोविडमुळे अनेकांच्या हाताची रोजीरोटी गेलेली असतानाच, त्यात करून अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकेचे भाडे भरणे रूग्ण किंवा मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना शक्य होत नाही.त्यामुळे जिल्हा रुग्णालय, शिरवल व हरकुळ बुद्रुक येथील कोविड केअर सेंटर या ठिकाणी कणकवली शहरातील दाखल करायच्या रुग्णांना घरापासून ते कोविड सेंटरपर्यंत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यामार्फत मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.
या तीनही ठिकाणी जर या आजारामुळे कणकवली शहरातील रुग्णाचे निधन झाले. तर, त्या रुग्णाला त्या ठिकाणाहून कणकवली स्मशानभूमी पर्यंत रुग्णवाहिकेत द्वारे मोफत आणण्याची व्यवस्था देखील नगराध्यक्ष श्री नलावडे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
कणकवली शहरातील कोविड पॉझिटीव्ह आल्यानंतर ज्या रुग्णांना कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी जायचे असेल किंवा शहरातील कोविड ने मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी याबाबत थेट माझ्याशी ( ९४२०२०६४६४) या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले आहे.
गेले चार दिवस नगराध्यक्ष. नलावडे यांच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, बाळा वळंजू मित्रमंडळची रुग्णवाहिका यासाठी उपलब्ध करून ठेवण्यात आली असल्याचे नलावडे यांनी सांगितले. कणकवली शहरातील कोविडच्या सर्वच रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे नलावडे यांनी सांगितले.