भाजपला बदनाम करण्यासाठी मित्र पक्षांचे प्रयत्न  - प्रमोद जठार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 08:08 PM2017-10-31T20:08:56+5:302017-10-31T20:09:09+5:30

भाजपला बदनाम करण्यासाठी सिंधुदुर्गातील शिवसेना तसेच राष्ट्रिय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहेत

Friend parties' attempts to defame the BJP - Pramod Jathar's allegations | भाजपला बदनाम करण्यासाठी मित्र पक्षांचे प्रयत्न  - प्रमोद जठार यांचा आरोप

भाजपला बदनाम करण्यासाठी मित्र पक्षांचे प्रयत्न  - प्रमोद जठार यांचा आरोप

Next

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम असो अथवा अन्य विकास कामे असोत यामध्ये खोडा घालण्याचे काम श्रेयासाठी केले जात आहे. शिवसेनेत तर कार्यकर्त्यांपेक्षा इंजिनियरच जास्त झाले आहेत. भाजपला बदनाम करण्यासाठी सिंधुदुर्गातील शिवसेना तसेच राष्ट्रिय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केला. येथील भाजप संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, बबलू सावंत उपस्थित होते.

प्रमोद जठार म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीकडून खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. मात्र, त्यांना काम करायला शिवसेना तसेच स्वाभिमान पक्षाकडून रोखले जात आहे. विविध कारणे सांगून हे काम रोखले जात आहे. हे  त्यांचे सर्व उपद्व्याप भाजप पक्षाला बदनाम करण्यासाठीच आहेत.

त्यामुळे आमचे त्यांना सांगणे आहे की , रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम संबधित कंपनीला करु द्या. अन्यथा या खड्यामुळे अपघात होऊन जनतेचे बळी गेले तर त्याला  काम रोखणारेच जबाबदार असतील. डागडुजीचे काम केल्यानंतर रस्ता खराब झाल्यास पुन्हा काम करायला त्या कंपनीला सांगता येईल. मात्र, काम न झाल्यास त्याचा सामान्य जनतेला त्रास होणार असून त्याची सर्वतोपरी जबाबदारी या विरोध करणाऱ्यांचीच असेल.

कोणतेही विकास काम हाती घेतले की, आमचे मित्र पक्षच प्रथम त्याला विरोध करीत असतात. वैभववाडी बस स्थानकाच्या जागे बाबतही असेच झाले होते. या कामाचे श्रेय भाजपला मिळू नये म्हणून शिवसेनेचे आमदार तसेच त्यांचे काही पदाधिकारी तहसिलदाराना संपर्क करून जागा एस.टी.च्या ताब्यात देवू नका .अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगत होते. त्यामुळे या विरोध करणाऱ्यानी श्रेय वादाची स्पर्धा करण्यापेक्षा विकास करण्यासाठी स्पर्धा करावी.

राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मी विनंती केली आहे की, रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची कामे करण्यासाठी जिल्हानिहाय ठेका देण्यात यावा. ज्या मोठ्या कंपनीकडे जिल्ह्यातील सर्व कामे एकत्रितपणे करण्याची कूवत असेल, यंत्रणा असेल अशा कंपनीला ठेका देण्यात यावा.  रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर त्या कंपनीवर पाच वर्षे तो रस्ता सुस्थितित ठेवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.  त्यामुळे चांगले काम होईल. तसेच या कामातील राजकारण्यांचा हस्तक्षेप थांबल्याने ठेका घेतलेल्या कंपनीला दर्जेदार काम करता येईल. पोट ठेकेदार नेमूण करण्यात येणारा भ्रष्टाचार थांबेल. त्यासाठी काँग्रेसच्या कार्यकालातील व्यवस्था बदलण्याची विनंती बांधकाम मंत्र्याना केली असून सिंधुदुर्गात याबाबतचा पायलट प्रोजेक्ट करावा असेही त्यांना सांगितले आहे.

तळेरे ते गगनबावडा रस्ता खराब झाला असून या रस्त्याच्या कामासाठी बांधकाम मंत्र्यानी साडे पाच कोटि रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे.तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहिरनाम्यात आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे सिंधुदूर्गातील 429 ग्रामपंचायतीत ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमण्यात येणार आहेत असेही प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.
    
केंद्रीय नितिन गडकरींसोबत बैठक !
गोवा येथे 6 व 7 नोव्हेंबर रोजी केंद्रीय रस्ते व  वाहतूक मंत्री नितिन गडकरी येणार आहेत. यावेळी मुंबई गोवा महामार्ग चौपदरिकरणा बाबत सिंधुदुर्गातील भाजप पदाधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांची महत्वाची बैठक होईल. या बैठकीत येथील समस्या मांडण्यात येतील. महामार्गाचे काम लवकर तसेच व्यवस्थितरीत्या होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पाठ पुरावा केंद्र सुरु करून तिथे अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे जठार यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय मेळावा !
महाराष्ट्रात भाजप शासनाला तिन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शासनाचे विकासात्मक काम सिंधुदुर्गातील तळागाळातील जनतेपर्यन्त पोहचविण्यासाठी 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच 7 नोव्हेंबर रोजी कणकवली, 8 नोव्हेंबर रोजी सावंतवाड़ी तर 9 नोव्हेंबर रोजी कुडाळ विधानसभा मतदार संघाचा मेळावा घेण्यात येणार आहे. या पंधरवड्याचा समारोप जिल्हास्तरीय मेळाव्याने करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. भाजपचे सिंधुदुर्गातील 67 ग्रामपंचायतीत सरपंच बसले असून 750 ग्रामपंचायत सदस्य तर भाजपच्या विचाराच्या 21 गाव पॅनेलला निवडणुकीत यश मिळाले आहे. या सर्वांचा सत्कार मुख्यमंत्री तसेच अन्य नेत्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Friend parties' attempts to defame the BJP - Pramod Jathar's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा