आई-वडिलांसमोरच मुलगा समुद्रात बुडाला

By admin | Published: May 14, 2017 10:45 PM2017-05-14T22:45:14+5:302017-05-14T22:45:14+5:30

गुहागरातील घटना; मूळचा सांगली जिल्ह्यातील

In front of parents, the boy sank in the sea | आई-वडिलांसमोरच मुलगा समुद्रात बुडाला

आई-वडिलांसमोरच मुलगा समुद्रात बुडाला

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : गुहागरात पर्यटनासाठी आलेला १३ वर्षीय मुलगा समुद्रात पोहत असताना बुडाला. पुष्कराज राजाराम पाटील (मूळ गाव, बहे ता.वाळवा जि.सांगली, सध्या रा.कऱ्हाड जि.सातारा) असे या मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजता घडली. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.
कऱ्हाडमधून पाटील कुटुंबिय व त्यांचे नातेवाईक असे सात जण पर्यटनासाठी शनिवारी दुपारी एक वाजता गुहागरमध्ये दाखल झाले. यामध्ये राजाराम आत्माराम पाटील (४३), पत्नी राजमती राजाराम पाटील, मुलगा पुष्कराज पाटील, मुलगी ऋतुजा राजाराम पाटील तसेच साडू राजेंद्र तुकाराम पाटील, सुनिता तुकाराम पाटील व मुलगी स्वराली तुकाराम पाटील यांचा समावेश होता. बाजारपेठेतील योगेश्वरी हॉटेलमध्ये ते उतरले. सायंकाळी गुहागर बाजारपेठ व समुद्रावर त्यांनी फेरी मारली. सकाळी पुन्हा ७.३० वाजता समुद्रात पोहण्यासाठी गेले. हे सातजण समुद्रात डुंबण्याचा आनंद घेत होते. अचानकपणे आलेल्या एका मोठ्या लाटेमध्ये पुष्कराज पाण्यामध्ये खेचला गेला. राजाराम पाटील यांना आपला मुलगा बुडत असल्याचे लक्षात आले. त्यांनी पुष्कराजला हात देण्याचा प्रयत्नही केला. मात्र लाटेच्या तडाख्यात पुष्कराज एवढा खोल खेचला गेला आणि बुडाला.पाटील कुटुंबियातील सहाजण बाजूला असूनही त्यांच्या डोळयादेखत पुष्कराज बुडाला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बाजूला असलेले पर्यटक व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पुष्कराजचे वडील राजाराम पाटील हे आष्टा (सांगली) येथे प्राध्यापक आहेत तर आई राजमती ही पाटण येथे प्राध्यापिका आहे.
गुहागरचे पोलिस उपनिरीक्षक दीपक कदम यांनी घटनास्थळी येऊन पाटील कुटुंबियांना धीर दिला. मुलगा बुडाल्याचे वृत्त समजताच नगरपंचायतीचे जीवरक्षक, अ‍ॅडव्हेंचर बोटींगच्या कर्मचाऱ्यांनी स्पीडबोटच्या सहाय्याने पाण्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत नातेवाईक, पोलिस व ग्रामस्थांनी शोधमोहीम चालू होती.




यापूर्वीही पर्यटक बुडण्याच्या घटना
गुहागर समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना जवळपास वर्षभराच्या फरकाने घडतच आहेत. यापूर्वी २६ सप्टेंबर २०१५ रोजी दुपारच्या वेळेत जेटीच्या शेजारी चेंबुर (मुंबई) येथील बद्रुद्दीन युसूफ अल्ला शेख यांच्यासह त्यांचे दोन मुलगे व एक मुलगी तसेच चिपळूण येथील प्रा. चांदा यांच्या दोन मुली व भावाचा मुलगा असे एकाचवेळी सातजण बुडाले होते.

Web Title: In front of parents, the boy sank in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.