ग्रामस्थांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा
By Admin | Published: November 2, 2016 11:16 PM2016-11-02T23:16:05+5:302016-11-02T23:16:05+5:30
पोलिस पाटलांच्या कारभारावर तीव्र संताप : अपघातग्रस्त कुटुंबियांना मदतीची मागणी
कुडाळ : कुडाळचे पोलिस पाटील अनंत कुडाळकर यांनी त्यांच्या मुलाच्या रिक्षाला झालेला अपघातात चार वर्षीय श्रवण हरमलकर या बालकाचा मृत्यू होऊनही आपले कर्तव्य बजावले नाही. त्यामुळे त्यांना ताबडतोब पदावरून हटवून अपघातग्रस्त ुकुटुंबियांना न्याय द्या, अशी मागणी कुडाळ-कविलकाटे येथील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली. बुधवारी शेकडो ग्रामस्थांनी पोलिस पाटलांच्याविरोधात प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढून निवेदन देत आपला रोष व्यक्त केला.
यावेळी ग्रामस्थांनी पोलिस पाटलांविरोधात तक्रारींचा पाढाच प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांच्यासमोर वाचला. पोलिस पाटलांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल व ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व मुद्यांची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन डॉ. सूर्यवंशी यांनी जमावाला दिले.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुडाळ मच्छिमार्केट येथे झालेल्या अपघातात पोलिस पाटील अनंत कुडाळकर यांचा मुलगा हरेश याच्या रिक्षाची धडक झालेल्या अपघातात श्रवण हरमलकर याचा मृत्यू झाला. यावेळी अनंत कुडाळकर यांनी उद्धट वागणूक दिल्याचा आरोप करीत बुधवारी कुडाळ शहर तसेच कविलकाटे येथील ग्रामस्थ त्यांच्या विरोधात एकत्रित झाले. एस. एन. देसाई चौक येथे दुपारी ३ वाजल्यापासून नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले.
प्रांत कार्यालयात मोर्चा गेल्यानंतर तेथे निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे अनंत कुडाळकर यांच्याविरूध्द असणाऱ्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. मुलाच्या रिक्षाची ठोकर बसून लहान मुलाचा जीव गेला. या घटनेनंतर कुडाळकर यांनी नागरिकांशी हुज्जत घातली. पोलिस पाटीलपदावरून त्यांनी नागरिकांचा अपमान केला. पुत्रपे्रमापोटी ते आपले कर्तव्य विसरले. पोलिसांत त्यांनी खबर दिली नाही. यापूर्वी त्यांच्याबाबत तक्रारी होत्या. तेव्हा पोलिसांनी हमीपत्र घेतले होते. ते अॅट्रासिटी कायद्याचा धाक दाखवून नेहमी प्रकरणे मिटवित. त्यांची चौकशी व्हावी. त्यांच्यावर यापूर्वी अदखलपात्र-दखलपात्र स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची चौकशी करून रिक्षा परमिट रद्द करण्याची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सूचित करावी. यापूर्वी एकदा त्यांना पोलिस पाटीलपदावरून कमी करण्यात आले होते. या सर्वांचा विचार करून अपघाताच्या घटनेनंतर त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली असल्याने त्यांना पदावरून तत्काळ हटविण्याची मागणी करण्यात आली.
तसेच श्रवण हरमलकर याचे कुटुंब गरीब आहे. त्यामुळे त्या कुटुंबाला शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्याबाबतही पाठपुरावा करण्याचे आश्वासन डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.
यावेळी नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष आबा धडाम, अभय शिरसाट, संजय पडते, संजय भोगटे, ओंकार तेली, सुनील बांदेकर, एजाज नाईक, उषा आठल्ये, महेंद्र वेंगुर्लेकर, राकेश कांदे, संतोष शिरसाट, रूपेश पावसकर, धीरज परब, बाळा पावसकर आदी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
बालकांनी दिले प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
प्रांताधिकारी यांना कार्यालयाच्या बाहेर येऊन निवेदन स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. याबाबत ग्रामस्थांनी चर्चा केल्यानंतर साई वेंगुर्लेकर, संजय मसूरकर, कमल जळवी, सुजल जळवी या लहान मुलांच्या हस्ते प्रांताधिकारी डॉ. सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
सखोल चौकशी करणार : सूर्यवंशी
यानंतर जमावाला सामोरे जाताना डॉ. सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांच्या प्रत्येक मुद्द्याची चौकशी केली जाईल. तसेच कुडाळकर यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल व त्यांच्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले.
सर्व पक्षीयांच्या एकीने कारवाईकडे लक्ष
पोलिस पाटलांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांसह शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस अशा सर्वच पक्षांचे पदाधिकारी एकवटल्याचे चित्र मोर्चादरम्यान दिसून आले. त्यामुळे आजच्या मोर्चानंतर प्रांताधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.