सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर लाटणे मोर्चा

By admin | Published: June 3, 2014 01:46 AM2014-06-03T01:46:37+5:302014-06-03T01:59:49+5:30

आशा वर्कर्स आक्रमक : प्रलंबित विविध मागण्यांसाठी निवेदन

Frontline Morcha on Sindhudurg Zilla Parishad | सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर लाटणे मोर्चा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर लाटणे मोर्चा

Next

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने जिल्हा परिषद भवनावर आज, सोमवारी लाटणे मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राज्यात अतिशय चांगले पण फारच कमी मोबदल्यावर काम करणार्‍या आशा व गटप्रवर्तक यांच्या अनेक मूलभूत मागण्यांबाबत राज्य सरकारने केवळ आश्वासने देऊन प्राथमिक निर्णयाबद्दलही प्रचंड दिरंगाई करून त्यांची घोर फसवणूक केली आहे. जनतेच्या सेवेसाठी असणार्‍या इतर योजना जशा अंगणवाडी, रोजगार हमी योजना, शालेय पोषण आहार योजना यातील कर्मचार्‍यांना मानधन किंवा वेतन मिळते. मग आशांनाच मानधन किंवा वेतन का नाही? त्यामुळे आशा कर्मचार्‍यांमध्ये नाराजी आहे. त्यांचा सरकारवरील विश्वास ढासळत चालला आहे. आशा कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषद भवनासमोर लाटणे मोर्चा काढण्यात आला. यावेळी करण्यात आलेल्या मागण्या - आशांना व गटप्रवर्तकांना ग्रामीण पातळीवरील आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत कायम करावे. आशांना सात हजार व गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये निश्चित मानधन सुरू करावे. आशांच्या कुटुंबीयांना मेडिक्लेम लागू करावा. गोवर-बुस्टर लसीकरणासह अनेक योजनांचा बंद केलेला मोबदला ताबडतोब सुरू करावा. मासिक व त्रैमासिक मिटिंग भत्त्यात भरीव वाढ करावी. आदी मागण्यांसाठी आजचा मोर्चा काढण्यात आला होता. आशा संजीवनी योजना राबविणार संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या की, कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आशा संजीवनी योजना राबविणार. यासाठीची योग्य ती कार्यवाही सुरू करणार आहे, अशी माहिती संघटनेच्यावतीने पत्रकारांना देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील आशांना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला असल्याचेही यावेळी संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Frontline Morcha on Sindhudurg Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.