वेंगुर्लेत सत्तेसाठीच मोर्चेबांधणी
By Admin | Published: October 13, 2016 09:33 PM2016-10-13T21:33:24+5:302016-10-13T21:33:24+5:30
सेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी तयारीत : युती, उमेदवारांसाठी चाचपणी; सभापतींसह तीन विद्यमानांना संधी!
प्रथमेश गुरव -- वेंगुर्लेतील नव्या आरक्षणाने बहुतांशी उमेदवारांची अडचण झाली आहे. सभापतींसह तीन विद्यमानांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्या तीन वर्षांत राष्ट्रवादीने सत्ता गाजविली, तर शेवटच्या दोन वर्षांत शिवसेनेने अनपेक्षितपणे पंचायत समितीवर सत्ता मिळविली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सत्ता टिकविण्यासाठी शिवसेना, गेलेली सत्ता परत मिळविण्यासाठी काँगे्रस, तर नव्या जोमाने जिल्ह्यात विस्तारित झालेला भाजप आणि जिल्ह्यात संजीवनीची गरज असणाऱ्या गत विजेत्या राष्ट्रवादीत लढत रंगणार आहे. आगामी युती आणि उमेदवारांच्या शोधासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाल्याचे चित्र वेंगुर्ले पंचायत समितीत पाहावयास मिळत आहे.
वेंगुर्ले पंचायत समितीचे १० मतदारसंघ असून, मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ६, काँग्रेसचे ३ व अपक्ष १ अशी संख्या होती. राष्ट्रवादीचे अभिषेक चमणकर यांची सभापतिपदी वर्णी लागली होती. चमणकर यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेना पुरस्कृत सुचिता वजराठकर यांची सभापतिपदी वर्णी लागली व पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली.
सध्या पडलेल्या पंचायत समितीच्या आरक्षणानुसार पूर्वीचा आरवली मतदारसंघ आता शिरोडा मतदारसंघ झाला आहे, तर उर्वरित मतदारसंघ पूर्वीप्रमाणेच आहेत. शिरोडा पंचायत समिती मतदारसंघ खुला झाल्याने विद्यमान सदस्या उमा मठकर यांच्यासह रेडी पंचायत समिती मतदारसंघ खुला झाल्याने विद्यमान सदस्य चित्रा कनयाळकर यांना संधी आहे. मात्र, रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ हाही खुला असल्याने येथील काँग्रेसच्या विद्यमान सदस्या निकिता परब यांनी उमेदवारी न मागितल्यास या मतदारसंघातील जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसकडून चित्रा कनयाळकर यांचे नाव चर्चेत आहे. उभादांडा पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने विद्यमान सदस्य व माजी सभापती अभिषेक चमणकर यांची संधी हुकली आहे. याठिकाणी काँग्रेसतर्फे परबवाडा सरपंच इनासिन फर्नांडिस, राष्ट्रवादीच्या सरोज परब यांची नावे चर्चेत आहेत.
उभादांडा जिल्हा परिषद मतदारसंघ यावेळी खुला झाल्याने अभिषेक चमणकर यांना जिल्हा परिषदेसाठी संधी चालून आली आहे, तर शिवसेनेतर्फे रमेश नार्वेकर व विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुकन्या नरसुले, काँग्रेसतर्फे माजी सभापती सारिका काळसेकर, युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नीलेश चमणकर यांची नावे चर्चेत आहेत. परुळे पंचायत समिती मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असल्याने विद्यमान सदस्या प्रणाली बंगे यांना संधी आहे.
तुळस पंचायत समिती मतदारसंघ खुला असल्याने विद्यमान सभापती सुचिता वजराठकर यांना संधी आहे. शिवसेनेतर्फे बाळू परब, मकरंद परब, तर काँग्रेसतर्फे मनीष दळवी, विजय रेडकर यांची नावे चर्चेत आहेत. तुळस जिल्हा परिषद मतदारसंघ इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने विद्यमान सदस्या योगिता परब यांचा पत्ता कट झाला आहे. म्हापण पंचायत समिती मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव असल्याने विद्यमान सदस्य पुरुषोत्तम परब यांची संधी हुकली आहे. म्हापण जिल्हा परिषद मतदारसंंघ हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असून, विद्यमान सदस्या वंदना किनळेकर यांना पुन्हा संधी आली आहे. आडेली पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी असल्याने विद्यमान उपसभापती स्वप्निल चमणकर यांचा तसेच आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी असल्याने विद्यमान सदस्य
समीर नाईक यांचाही पत्ता कट झाला आहे.
वायंगणी पं. स. मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी असल्याने विद्यमान सदस्य समाधान बांदवलकर यांचा पत्ता कट झाला आहे. मातोंड पंचायत समिती मतदारसंघ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग असल्याने विद्यमान सदस्य सावरी गावडे यांची संधी हुकली आहे. काँग्रेसकडून सोमा मेस्त्री, ज्ञानेश्वर केळजी, शिवसेनेकडून शामसुंदर पेडणेकर यांची नावे चर्चेत आहेत. आसोली पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण असल्याने विद्यमान सदस्य तथा माजी उपसभापती सुनील मोरजकर यांना संधी चालून आली आहे.
पदाधिकाऱ्यांची धावपळ आणि राजकीय आडाखे
दरम्यान, बदललेल्या आरक्षणाने सर्वच पक्षांचा गोंधळ उडाला असून, तालुका पदाधिकारी आपल्या पक्षांचा उमेदवार शोधण्यासासाठी सक्रिय झाला आहे. तसेच आगामी युतीसाठीही हे पदाधिकारी प्रभागनिहाय आडाखे बांधत असून, वरिष्ठांपेक्षा जनतेला रूजणारी युती करण्याकडे त्यांचा कल दिसून येत आहे.
राष्ट्रवादीला
संजीवनीची संधी
दरम्यान, जिल्ह्यात बॅकफूटवर गेलेली राष्ट्रवादी वेंगुर्लेत मात्र अजूनही आपला झेंडा ताठ मानेने घेऊन उभी आहे. गत निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत जर राष्ट्रवादीने सत्ता मिळविली तर पक्षाला जिल्ह्यात संजीवनी मिळणार आहे.