महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर इंधन दराचे युद्ध
By admin | Published: October 11, 2015 11:08 PM2015-10-11T23:08:10+5:302015-10-12T00:39:27+5:30
कर्नाटकात फलक झळकले : महाराष्ट्रापेक्षा तीन ते साडेतीन रुपये स्वस्तात विक्री होत असल्याने गर्दी --लोकमत विशेष
मिरज : पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी रद्द करून आकारण्यात येणाऱ्या स्थानिक व दुष्काळ करामुळे राज्यात इंधन महागले आहे. कर्नाटकात इंधन स्वस्त असल्याने कर्नाटक सीमेवरील व महामार्गावरील पेट्रोल पंपांना मोठा फटका बसला आहे. कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपांवर ‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त’ असे फलक लावण्यात आले आहेत. इंधन कर कमी करण्यासाठी पेट्रोल पंपचालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.राज्यात एक आॅक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द करून डिझेलवर प्रति लिटर दोन रुपये दुष्काळ कर आकारणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही डिझेल महागले आहे. महाराष्ट्रात विविध स्थानिक करांमुळे लगतच्या कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, गोवा या सात राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सरासरी ३.५० रुपये प्रति लिटर जादा दर आहे. त्यामुळे राज्याच्या सीमेवर असलेल्या पेट्रोल पंपांच्या इंधन विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात मुंबई विकास कर (स्टेट स्पेसिफिक सरचार्ज) म्हणून प्रति लिटर तीन रुपये आकारणी होते.
नागपूर, औरंगाबाद, नंदुरबार, ठाणे, अमरावती, बारामती या शहरात रस्ते विकासासाठी प्रति लिटर १ ते ४ रुपये जादा व्हॅट आकारणी होते. पुणे, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर या शहरात लष्करी छावणी असल्याने येथे इंधनावर एलबीटी व जकात वसुली आजही सुरू आहे. त्यातच या महिन्यापासून डिझेलवर दुष्काळ कर आकारणी सुरू करण्यात आल्याने, शेजारच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर वाढले आहेत. अनेक शहरात पेट्रोल, डिझेलचे दर वेगवेगळे असल्याने शहरातील व शहराबाहेरील पेट्रोल पंप चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यांतर्गत मालवाहतुकीतून ४० टक्के डिझेल विक्री होते.
दरवाढीमुळे डिझेल विक्री शेजारच्या राज्यात स्थलांतरित होऊन हजारो कोटींचे नुकसान होण्याची भीती राज्यातील पेट्रोल पंप चालकांना आहे. महाराष्ट्रात इंधन दरवाढ झाल्यामुळे कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपांच्या इंधन विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्नाटक हद्दीतील पेट्रोल पंपांवर महाराष्ट्रापेक्षा स्वस्त इंधनाचे फलक झळकत आहेत. राज्य शासनाने इंधनावरील वेगवेगळे अधिभार व स्थानिक कर कमी करून दरातील तफावत दूर करण्याची पेट्रोल पंप चालकांची मागणी आहे.
व्यवसायावर परिणाम : पंपचालक चिंताग्रस्त
महाराष्ट्राच्या तुलनेत डिझेल गोव्यात प्रति लिटर ५.५० रुपये, गुजरातमध्ये ३.६२, कर्नाटकात ३.५२, छत्तीसगडमध्ये ३.५३, आंध्रमध्ये १.८१ रुपये स्वस्त आहे. पेट्रोल सरासरी २ ते ३ रुपये स्वस्त आहे. त्यामुळे इंधन विक्री व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे पेट्रोल पंप चालकांचे म्हणणे आहे. कर रद्द करण्याच्या मागणीबाबत मंगळवार, दि. १३ रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत पेट्रोल पंप चालकांची बैठक होणार आहे.
दररोज सहाशे ते एक हजार लिटरने घट
जिल्ह्यातील १७८ पेट्रोल पंपांपैकी मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात कर्नाटक सीमेवर सुमारे ४० टक्के पेट्रोल पंप आहेत. सीमेवरील पेट्रोल पंपांवरील इंधन विक्रीत दररोज सहाशे ते एक हजार लिटर घट झाली आहे. विक्री घटल्यामुळे या पेट्रोल पंपांवरील कामगारांत कपात करावी लागणार आ
हे.
वेगवेगळ्या स्थानिक करांमुळे पेट्रोल व डिझेलची दरवाढ होऊन इंधन विक्रीत घट झाली आहे. स्थानिक कर रद्द करावा, या मागणीसाठी पेट्रोल पंप चालकांना आंदोलन करावे लागणार आहे. जिल्ह्यात मिरज, कवठेमहांकाळ व जत या कर्नाटक सीमेवरील तालुक्यातील पेट्रोलपंपांच्या इंधन विक्रीवर परिणाम झाला आहे. इंधनावरील कर रद्द करण्याबाबत अर्थमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही, तर इंधन विक्री बंद आंदोलन करण्यात येईल.
- संतोष आरवट्टगी, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल पंप मालक संघटना