प्रशासकीय तयारी पूर्ण, उद्या होणार मतदान
By admin | Published: April 16, 2016 12:28 AM2016-04-16T00:28:56+5:302016-04-16T00:29:30+5:30
कुडाळ नगरपंचायत निवडणूक : प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक तैनात
कुडाळ गावाकडून नगराकडे
रजनीकांत कदम -- कुडाळ
कुडाळ नगरपंचायतीच्या १७ जागांच्या निवडणुकीची सर्व प्रकारची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक तैनात करण्यात येणार आहे.
कुडाळ निवडणुकीच्या १७ प्रभागांसाठी १७ मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीसाठी एकुण १२ हजार ६७ मतदार असून यामध्ये ६ हजार १२३ पुरूष तर ५ हजार ९४४ महिला मतदार आहेत. एकूण १७ मतदान केंद्र्रे आहेत. मतदान काळात अधिकारी कर्मचाऱ्यांना तीन प्रशिक्षणे ठेवण्यात आली असून यापैकी पहिले प्रशिक्षण १ व दुसरे १२ एप्रिल रोजी पार पडले आहे. तिसरे प्रशिक्षण १६ एप्रिल रोजी होणार आहे. १६ तारीखला मतदान साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मतदान मोजणीचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सदरच्या मतदान प्रक्रियेकरीता एकूण ७६ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये वर्ग एकचे अधिकारी २, क्षेत्रिय अधिकारी ६, केंद्राध्यक्ष १९, मतदान अधिकारी १९, कर्मचारी ३८ तसेच शासकीय आठ वाहने आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मतदानाच्या दिवशी १२ पोलिस अधिकारी, ९८ पोलिस कर्मचारी, एस. आर. पी. एफ. फोर्स व आर. सी. पी. फोर्स अशा प्रकारे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मतमोजणीच्या वेळी ४ पोलिस अधिकारी, ५५ पोलिस कर्मचारी, एस. आर. पी. एफ. फोर्स व आर. सी. पी. फोर्स अशा प्रकारे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. न्यू इंग्लिश स्कूल कुडाळमध्ये चार मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. यात प्रभाग १ कविलकाटे, प्रभाग २ डॉ आंबेडकर नगर व प्रभाग ८ मस्जिद मोहल्ला यांचा समावेश आहे. तर कन्या शाळेत दोन मतदान केंद्रे आहेत. जिल्हा परिषद कन्या शाळा या ठिकाणी दोन प्रभागांची मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रभाग ३ लक्ष्मीवाडी, प्रभाग ४ बाजारपेठ यांचा समावेश आहे. तर जिल्हा परिषद केंद्रशाळा येथे प्रभाग ५ कुडाळेश्वरवाडी व प्रभाग ६ गांधी चौक या प्रभागांची मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. जिल्हा परिषद कुंभारवाडी शाळेत तीन प्रभागांची तीन मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रभाग ९ नाबरवाडी, प्रभाग १० केळबाईवाडी व प्रभाग १५ मधली व खालची कुंभारवाडी यांचा समावेश आहे.
कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे तीन प्रभागांची मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रभाग ११ वाघसावंत टेंब, प्रभाग १२ हिंदू कॉलनी व प्रभाग १३ श्रीरामवाडी या प्रभागांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद पडतेवाडी शाळेत दोन प्रभागांसाठी दोन मतदान केंद्र ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रभाग १४ अभिनवनगर, प्रभाग १६ एमआयडीसी परिसर या प्रभागांचा समावेश आहे. जिल्हा परिषद सांगिर्डेवाडी शाळेत प्रभाग १७ सांगिर्डेवाडीचे एक मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदान केंद्राच्या माहितीबरोबरच या मतदान केंद्राप्रमाणे मतदार याद्याही निश्चित करण्यात आल्या असून, त्या मतदार याद्याही प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.