मंत्री राणेंच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी २५ लाखाचा निधी, सत्ताधारी व विरोधकामध्ये जोरदार खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 05:07 PM2021-11-25T17:07:10+5:302021-11-25T17:08:01+5:30
कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी नगरपंचायत पंचवीस लाख रूपये खर्च करणार आहे. ...
कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी नगरपंचायत पंचवीस लाख रूपये खर्च करणार आहे. मात्र, त्या ठिकाणी अगोदरच रस्ता आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील या रस्त्यासाठी शहरवासीयांच्या करातून जमा झालेला निधी खर्च का करायचा? असा सवाल नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केला. तसेच या प्रस्तावास आपला विरोध असल्याचे सांगितले. त्यावरून गुरुवारी नगरपंचायत सभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली.
कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्याने कणकवली नगरपंचायतीची ऑफलाईन सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अनुपस्थितीत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या अध्यक्षतेखाली प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात झाली.
या सभेत प्रामुख्याने केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या घरापर्यंत जाणार्या रस्त्याचा प्रश्न चर्चेत आला. नगरसेवक कन्हैया पारकर यांनी या रस्त्याच्या कामाबाबत नगरपंचायत प्रशासनाने जिल्हाधिकार्यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप केला. सत्ताधार्यांनी त्याला आक्षेप घेतला. या मुद्द्यावर बराच वेळ चर्चा झाल्यावर पारकर यांनी आपला या प्रस्तावाला विरोध असल्याचे सांगितले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शिघकृती दल स्थापन करण्याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली. यावेळी बँडअँब्रेसीडरमधून उद्योजक दीपक बेलवकर यांची निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायाचा पुतळा स्थालांतरणाबाबत दोन जागा निश्चित केल्या आहेत. या जागा नगरपंचायतीकडे हस्तांतरित होण्याबाबत प्रक्रियेबाबत माहिती बंडू हर्णे यांनी दिली. तसेच या जागांचे हस्तांतरण करण्याबाबत ठराव घेऊन जिल्हाधिकार्यांना पाठविण्याचे ठरविण्यात आले.
विरोधी पक्षाचे गटनेते सुशांत नाईक, राष्ट्रवादीचे नगरसेवक अबिद नाईक अथवा इतर नगरसेवकांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून नगरपंचायतला निधी देताना आधी कामे ठरवावी. म्हणजे त्यांना निधीची कल्पना येईल. अशी विनंती बंडू हर्णे यांनी केली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेवक संजय कामतेकर, अॅड. विराज भोसले,उर्वी जाधव, अभिजीत मुसळे, बाबू गायकवाड, अबिद नाईक, मेघा सावंत, कविता राणे, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेेश नार्वेकर, माही परुळेकर, मानसी मुंज यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.