बंधाऱ्यासाठी निधी अपुरा

By admin | Published: October 2, 2014 10:06 PM2014-10-02T22:06:59+5:302014-10-02T22:22:58+5:30

पाणी अडवा योजना : जिल्ह्याला गरज अधिक पैशांची

Funding for the dam is insufficient | बंधाऱ्यासाठी निधी अपुरा

बंधाऱ्यासाठी निधी अपुरा

Next

रत्नागिरी : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, योजनेंतर्गत शासनाकडून बंधारे बांधण्यात येत आहेत. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात ४ कोटी ४७ लाख १४ हजार रूपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले होते. मात्र, यावर्षीसाठी केवळ २ कोटी ६ लाखाच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. गतवर्षीपेक्षा निधीमध्ये घट झालेली दिसून येत आहे.
नदीमधील पाणी अडवून ते जिरविण्यासाठी बंधारे बांधण्यात येतात. गावोगावी माती, वळण बंधारे व सिमेंटचे बंधारे बांधण्यात येतात. २०१२-१३ मध्ये सिमेंट बंधारे १५, तर वळण बंधारे १४ बांधण्यात आले होते. एकूण २९ बंधारे बांधण्यात आल्याने त्यासाठी दीड कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. २०१३-१४ मध्ये ५० बंधारे बांधण्यात आले. त्याकरिता ४ कोटी ४७ लाख १४ हजार रूपये खर्च करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र निम्माच निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा नियोजन मंडळातून १ कोटी ५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे, उर्वरित निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे.
बंधारे बांधकामासाठी सन २०१२-१३ मध्ये निधी कमी प्राप्त झाला होता. गतवर्षी निधीमध्ये वाढ झाली होती. परंतु यावर्षी पुन्हा निधी कमी प्राप्त झाला आहे. त्यामुळे यावर्षी बंधाऱ्यांचे बांधकाम रखडणार आहे.
दिवाळीनंतर बंधारे बांधकामाला प्रारंभ होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, बचत गट, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बंधारे बांधण्यात येतात. दिवाळीसुटीनंतर शाळा सुरू झाल्यानंतर बंधारे बांधकामाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावर बंधाऱ्यांची कामे हाती घेऊन ती पूर्ण करावीत, यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले असून, दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेतली जातील. यंदा निधी कमी असला तरी तो वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

गतवर्षी साडेचार कोटी यंदा मात्र केवळ २ कोटी ६ लाख.
निधीच्या कमतरतेचा फटका बंधाऱ्यांच्या कामांना.
गतवर्षी २९ बंधारे.
२०१३-१४ मध्ये ५० बंधारे.
जिल्हा नियोजन मंडळाकडील निधी १ कोटी ५ लाखाचा.
एक वर्षाच्या फरकाने पुन्हा निधीची बोंबाबोंब.
निवडणूक निकालानंतर म्हणजेच दिवाळी दरम्यान नव्या कामांना सुरूवात होण्याची शक्यता.

Web Title: Funding for the dam is insufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.