विज्ञान प्रयोगशाळांना निधी, जिल्ह्यातील पाच शाळांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:57 PM2021-03-31T16:57:13+5:302021-03-31T17:00:03+5:30
science School Sindhudurg-जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. यापूर्वी समग्र शिक्षा अभियानमधून जिल्ह्यात ४४ जिल्हा परिषदेच्या शाळांना अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा पुरविण्यात आलेल्या आहेत. आता नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत आणखी पाच शाळांना विज्ञान प्रयोगशाळा मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा नियोजनमधून ८० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
ओरोस : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. यापूर्वी समग्र शिक्षा अभियानमधून जिल्ह्यात ४४ जिल्हा परिषदेच्या शाळांना अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा पुरविण्यात आलेल्या आहेत. आता नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत आणखी पाच शाळांना विज्ञान प्रयोगशाळा मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा नियोजनमधून ८० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्राथमिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक गोडवा रुजला पाहिजे. विज्ञान अभ्यासाबाबत आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. तरच उद्या जिल्ह्यातून वैज्ञानिक तयार होणार आहेत. मात्र, यासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध होणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणे असलेली प्रयोगशाळा आवश्यक आहे. त्यामुळे याचा विचार करीत प्राथमिक शिक्षण विभागाने विज्ञान प्रयोगशाळा ही नावीन्यपूर्ण योजना तयार केली आहे. तसा प्रस्ताव तयार करीत जिल्हा नियोजनकडे मागणी केली होती. जिल्हा नियोजन मंडळाने त्याला मान्यता दिली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी यासाठी ८० लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आणखी पाच शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा सुरु होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यात हेत नं. १ केंद्र शाळा (वैभववाडी), इळये नं. १ (देवगड), कासार्डे नं. १ (कणकवली), पडवे नं.१ (कुडाळ), मळेवाड नं. १ (सावंतवाडी) या शाळांचा समावेश आहे.
पाच शाळा विज्ञान प्रयोगशाळा उपक्रमाअंतर्गत निवडण्यात आल्या आहेत. या शाळांची निवड करताना सर्वाधिक पटसंख्या हा एकमेव निकष लावण्यात आला आहे. इतर कोणतेही निकष लावण्यात आलेले नाहीत. या शाळेला परिसरातील शाळा जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नजीकच्या शाळांतील मुलांना सुद्धा या प्रयोगशाळेचा उपयोग होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
५२० उपकरणे असणार; शिक्षकांना प्रशिक्षण देणार
या विज्ञान प्रयोगशाळेत एकूण ५२० विज्ञान उपकरणे असणार आहेत. त्यामध्ये भौतिक, रासायनिक व जीवशास्त्र सामग्रीचा समावेश आहे. ही अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा असून यासाठी संबंधित शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली. उपकरणे कशी हाताळावी. प्रयोग कसे करावेत ? तसेच एखाद्या उपकरणाचा उपयोग काय ? याबाबत माहिती देण्यात येणार आहे. ही प्रयोगशाळा दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाला जोडलेली असून सर्व इयत्तांचे अभ्यासक्रम येथे प्रयोगातून अभ्यासता येणार आहेत.