जिल्ह्याचे भवितव्य अंधकारमय

By admin | Published: February 18, 2015 10:53 PM2015-02-18T22:53:35+5:302015-02-18T23:44:38+5:30

नीतेश राणे : सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेबाबत व्यक्त केला संशय

The future of the district is dark | जिल्ह्याचे भवितव्य अंधकारमय

जिल्ह्याचे भवितव्य अंधकारमय

Next

कणकवली : दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत पहिल्या पाच जिल्ह्यात समावेश असणाऱ्या सिंधुुदुर्ग जिल्ह्याचे भवितव्य सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे अंधकारमय बनले आहे. केंद्रात व राज्यात आपलीच सत्ता असल्याने विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी आणला जाईल अशी घोषणा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येते. मात्र, जिल्ह्यातील एकाही प्रकल्प किंवा विकासकामाबाबत ठोस भूमिका ते व्यक्त करीत नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा अधोगतीकडे चालला असल्याची टीका कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी येथे केली.कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार राणे म्हणाले, जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून सध्या शासन तसेच जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर सुरु असलेल्या हालचाली चिंताजनक आहेत. विविध विकासकामांसाठी मोठा निधी आणणार असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मात्र तसे होताना दिसत नाही. हत्ती पकड मोहीम जिल्ह्यात यशस्वी झाली. या मोहिमेसाठी प्रयत्न करणाऱ्यांचे तसेच प्रशासनाचे मी अभिनंदन करतो. नारायण राणे यांनी या मोहिमेसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. हत्तींकडून झालेल्या नुकसानीचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणे अडचणीचे ठरत आहे.
जिल्हा नियोजनच्या बैठकीत भातसाठ्याबाबत प्रश्न उपस्थित केला असता १५ दिवसांत नवीन गोदामाबरोबरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होेते. मात्र अद्याप काहीही झालेले नाही. शिवसेना व भाजपाच्या मंत्र्यांमध्ये अधिकारावरून वाद निर्माण झाले असून त्याचा परिणाम सिंधुदुर्गच्या विकासावर होत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी एखाद्या कॅबिनेट मंत्र्यांची पालकमंत्री म्हणून नेमणूक करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करणार आहे. नुकसानभरपाईबाबत सत्ताधारी आवाज उठविताना दिसत नाहीत. वित्तमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीच्यावेळी पालकमंत्र्यांनी सी वर्ल्डबाबत वेगळी भूमिका मांडली.
त्यामुळे सी वर्ल्ड प्रकल्प वेंगुर्ले की मालवण तालुक्यात व्हावा याबाबतची ठोस भूमिका त्यांनी जनतेसाठी स्पष्ट करावी. देवगड-जामसंडे नळयोजनेबाबतच्या बैठकीचे अधिकृत निमंत्रण आपल्याला देण्यात आले नव्हते.
मात्र, या बैठकीबाबत माहिती मिळावी यासाठी पत्र दिले तर पालकमंत्र्यांनी तिलारीसारखा प्रकल्प जामसंडे येथे व्हावा असे सांगितल्याचे समजले. माजी आमदार अजित गोगटे यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेमधून निधी या नळयोजनेसाठी दिला जाईल असे जाहीर केले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांची परस्परविरोधी वक्तव्ये जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. (वार्ताहर)

शिव वडापाव स्टॉल अधिकृत करा
मुंबईत अनेक मराठी माणसांनी शिव वडापाव स्टॉल उभारले असून त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हे स्टॉल अधिकृत करून स्टॉलधारकांच्या डोक्यावरील अनिश्चिततेचे सावट दूर करावे, अशी मागणी मुंबईच्या महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे, असे राणे म्हणाले.


सत्ताधाऱ्यांकडून कोकणवरच अन्याय का?
सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणातील अनेक पाटबंधारे प्रकल्प अपूर्ण आहेत. या प्रकल्पांसाठी निधीच उपलब्ध करून न दिल्याने कामे ठप्प आहेत.
कणकवली नगरपंचायतीला विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीमध्ये ५० टक्के कपात करण्यात आली आहे. निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने विकास ठप्प आहे.
हा कोकणवर अन्याय असून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष या समस्यांकडे वेधणार असल्याचे आमदार राणे म्हणाले.
जिल्हा नियोजन बैठकीत उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, अजूनही त्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही

Web Title: The future of the district is dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.