तीन मराठी शाळांचे भवितव्य अंधारात ?
By admin | Published: May 15, 2015 10:22 PM2015-05-15T22:22:22+5:302015-05-15T23:34:23+5:30
एकूण ५ शाळांचे अंदाजे २७ लाख ४६ हजार १४८ रुपये भाडे येणे बाकी असल्याने नगर परिषद सत्ताधाऱ्यांना शाळा ताब्यात घेण्याचा निर्णय घ्यावा लागला
चिपळूण : शहरातील नगर परिषद मालकीच्या पाच शाळांपैकी दोन शाळांचे थकीत भाडे जमा झाले असून, उर्वरित तीन शाळांचे भाडे अद्याप जमा झालेले नाही. त्यामुळे या शाळा ताब्यात घेण्याबाबत नगर परिषद प्रशासनाने हालचाली सुरु केल्याने शाळांचे भवितव्य अंधारात आहे. चिपळूण नगर परिषदेच्या मालकीच्या शहर परिसरात पाच इमारती असून यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरु आहेत. गेली अनेक वर्ष या शाळांचे थकित भाडे नगर परिषदेकडे जमा न झाल्याने व वारंवार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पत्र व्यवहार करुनही याबाबत कोणतीच हालचाल न झाल्याने नगर परिषद प्रशासनाने शहर व परिसरातील पाच शाळा ताब्यात घेण्याचा ठराव केला. त्यानुसार पाग मराठी मुलामुलींची शाळा यांचे थकित भाडे ५९ हजार रुपये तर बापटआळी येथील कन्या शाळेचे २ हजार रुपये असे ६१ हजार रुपये थकित भाडे जमा झाल्याने या शाळा पुढील शैक्षणिक वर्षात सुरु राहणार आहेत. एकूण ५ शाळांचे अंदाजे २७ लाख ४६ हजार १४८ रुपये भाडे येणे बाकी असल्याने नगर परिषद सत्ताधाऱ्यांना शाळा ताब्यात घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. दि.१० मे पर्यंत थकित भाडे जमा करण्याच्या सूचना संबंधित शिक्षण विभागाला करण्यात आल्या होत्या. त्यानुसार दोनच शाळांचे भाडे जमा झाले आहे. पेठमाप येथील मराठी व उर्दू तसेच शिवाजी चौक चिंचनाका या शाळांचे अद्यापही भाडे येणे बाकी असल्याने या शाळा नगर परिषद प्रशासनाने ताब्यात घेतल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची शक्यताअनेकांनी वतर्विली आहे.
सध्या मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला असला तरी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मराठी शाळेतच शिक्षण घ्यावे लागत आहे. मुलांच्या भवितव्याचा विचार करुन संबंधित शिक्षण विभागाने या शाळांचे थकित भाडे जमा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत व पुढील कारवाई टाळावी अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे. (वार्ताहर)