गडनदी पुल अपघाताला ५१ वर्षे पूर्ण : आठवणीना उजाळा देत वाहणार आदरांजली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 04:56 PM2019-09-27T16:56:59+5:302019-09-27T17:00:40+5:30
भजनाच्या माध्यमातून हरीनामाचा गजर करण्यासाठी ट्रक मधून निघालेल्या भजन प्रेमींवर ५१ वर्षापुर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी तेलीआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाच्यावतीने शनिवारी डबलबारी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरीनामाचा गजर करण्यासाठी ट्रक मधून निघालेल्या भजन प्रेमींवर ५१ वर्षापुर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी तेलीआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाच्यावतीने शनिवारी डबलबारी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२१ सप्टेंबर १९६८ रोजी शनिवारी सर्वपित्री अमावास्या होती. या दिवशी कणकवली शहर तसेच परिसरातील १२० भजन प्रेमी मालवण भरड दत्त मंदिर येथील डबलबारी सामन्याला निघाले होते. भजन महर्षि अर्जुन तावड़े बुवा व परशुराम सावंत बुवा यांच्यात हा सामना होता. कणकवली तेलीआळी तसेच हर्णेआळी येथून भजन प्रेमीना घेऊन ट्रक मालवणला निघाला होता.
कणकवली व वागदे गावच्या सीमेवर गडनदी पुलावरील वळणावर ट्रकचालकाचा अंदाज चुकला . तसेच तो ट्रक नदीत कोसळला. सर्वपित्री अमावस्येच्या काळरात्री भजन प्रेमिवर काळाने घाला घातला. अपघातात सुमारे ५१ जण जागीच ठार झाले होते. अनेक घरातील करती सवरती माणसे मृत झाली होती.
या घटनेची माहिती कणकवलीसह जिल्हाभर अल्पावधितच पोहचली. या संकटसमयी अनेक व्यक्ति मदतीला धावल्या. डॉक्टरांनी जखमीना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही जखमीना सावंतवाड़ी तर वेंगुर्ले येथेही उपचारासाठी पाठविण्यात आले. हा धक्का सहन करण्यासारखा नव्हता.
या अपघातातील मृतात्म्यांच्या आठवणी गेली ५१ वर्षे त्यांचे कुटुंबिय तसेच कणकवली वासीय सुदर्शन मित्र मंडळाच्या पुढाकारातून जतन करीत आहेत. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तेलीआळी येथे एकत्र येत भजनाच्या माध्यमातून मृत व्यक्तिना आदरांजली वाहत आहेत. या अपघाताला या वर्षी ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे.
यावेळी आमने सामने डबलबारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. कुडाळ , भरणी येथील बुवा विनोद चव्हाण व लिंगडाळ येथील बुवा संदीप लोके यांच्यात हा सामना रंगणार आहे. याबाबत तेलिआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाचे कार्यकर्ते बुजुर्ग व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस नियोजन करीत आहेत.