मुसळधार पावसानं गगनबावडा-कोल्हापूर मार्ग बंद, वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 10:41 AM2019-07-30T10:41:34+5:302019-07-30T10:42:22+5:30
तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथे रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्ग पहाटेपासून बंद झाला आहे.
- प्रकाश काळे
वैभववाडी(सिंधुदुर्ग): तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथे रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्ग पहाटेपासून बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, ती फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान गगनबावडा, कळे परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने पूर परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता एसटी व पोलीस प्रशासनाने वर्तवली आहे.
सोमवारी पहाटेपासून कोकणात मुसळधार कोसळणा-या पावसामुळे घाटमार्गात कोणताही अडथळा उद्भवला नव्हता. मात्र, मुसळधार पावसाचा घाटमाथ्यावर जोर वाढल्यामुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्ग एसटी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. मांडुकलीत रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे सकाळीच कोल्हापूरहून येणा-या एसटी बस उशिरापर्यंत वैभववाडीत पोहोचल्या नव्हत्या. दरम्यान पोलिसांनी तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेट्स लावले असून वैभववाडीहून कोल्हापूरकडे जाणारी एसटी वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे.