काळसेतील गावरहाटी १८ वर्षांनी सुरू
By admin | Published: December 17, 2014 08:18 PM2014-12-17T20:18:25+5:302014-12-17T23:09:22+5:30
चैतन्याचे वातावरण : गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश
चौके : गेली १८ वर्षे बंद असलेली काळसे गावातील गावरहाटी सर्व गावकरी, पालटदार, मानकरी, ग्रामस्थ सेवेकरी यांच्या गेल्या तीन वर्षांच्या अथक प्रयत्नातून व सर्व ग्रामदेवतांच्या कृपाआशीर्वादाने पुन्हा चालू करण्यात आली.
यानिमित्त काळसे गावातील रवळनाथ मंदिर, पाराण परब, खंचरंगी वेताळ, मारुती मंदिर, सातेरी मंदिर, लिंगेश्वर मंदिर, दांडेकर मंदिर, सिद्ध महापुरुष मंदिर तसेच इतर सर्व मंदिरांमध्ये एकादष्णी व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर काळसेवासीयांच्या उपस्थितीत श्री देव रवळनाथ मंदिर येथे चालू पालटदार आप्पा परब यांच्या हस्ते श्री देव रवळनाथाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व देवखांबांना नेसवून सजविण्यात आले आणि अवसार (वारेसूत्र) उभे करण्यात आले. (वार्ताहर)
गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान
तब्बल १८ वर्षांनी काळसे गावातील वारेसूत्र पुन्हा उभे राहताच रवळनाथ मंदिर परिसर टाळ्यांच्या कडकडाटात दणाणून निघाला. त्यावेळी मंदिरात उपस्थित प्रत्येक गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कुतूहल दिसून येत होते. त्यानंतर तरंगांनी रवळनाथ मंदिराला प्रदक्षिणा घातल्या आणि सर्व देवतांना नैवेद्य दाखवून देवांना पावणेर घालण्यात आला. उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तब्बल १८ वर्षांनी आपल्या गावात पुन्हा गावरहाटी चालू होऊन गावात पूर्वीप्रमाणे धार्मिक कार्यक्रम सुरू होणार या आनंदामुळे गावातील अनेकजण रवळनाथ मंदिराकडे निघाले होते.
मंदिर परिसराला
जत्रेचे स्वरूप
यावेळी रवळनाथ मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आता येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने सर्व देवस्थाने देवाच्या आदेशाने पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे मानकऱ्यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व गावकरी, मानकरी, पालटदार, ग्रामस्थ, सेवेकरी, महिला, तरुणांनी विशेष परिश्रम घेतले.