कुडाळ शहरात व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार, ८ जणांवर गुन्हा दाखल; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 02:12 PM2024-04-08T14:12:36+5:302024-04-08T14:13:49+5:30
विविध संघटनांच्या वतीने आल्या होत्या तक्रारी
कुडाळ : व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार चालविणाऱ्या कुडाळ शहरातील ५ व्हिडीओ गेम पार्लरमध्ये कुडाळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना आणि त्या ठिकाणी काम करताना आढळलेल्या तब्बल ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर संबंधित मालकांवर ही याप्रकरणी नोटिसा बजावून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कारवाईत ४३ हजारांच्या रोख रकमेसह ४६ मशीन मिळून तब्बल ९ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर यांनी व इतर पोलिस कर्मचाऱ्यानी शनिवारी रात्री उशिरा कुडाळ शहरातील ओम साईराम व्हिडीओ गेम, साई दर्शन व्हिडीओ गेम, कुडाळेश्वर व्हिडीओ गेम, मुजीब व्हिडीओ गेम आणि म्युझिक व्हिडीओ गेम यांच्यावर छापा टाकला, यावेळी या ठिकाणी व्हिडिओ गेमच्या नावाखाली इलेक्ट्रिक मशीनद्वारे जुगार खेळण्यात आल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण माळवे (३८, रा. कुडाळकर चाळ, केळबाई मंदिराजवळ), महादेश निषाद (३३, रा. रेल्वेस्टेशन रोड, कुडाळ), भीमराव परगणी (४४, रा. डाॅ. आंबेडकरनगर, कुडाळ), संजय वाडकर (५२, रा. सबनीसवाडा- सावंतवाडी), रफिक अगडी (४६, रा. पिंगुळी म्हापसेकर, तिठा), वैभव सरमळकर (२७, रा. कदमवाडी, कुडाळ), शैलेशकुमार गुप्ता (३९, रा. सालईवाडा- सावंतवाडी), अक्षय धारगळकर (२९, रा. कुडाळमधली, कुंभारवाडी) या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत सर्व व्हिडिओ गेम पार्लरवरमधील जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे ९ लाख २० हजार रुपये किमतीच्या ४६ मशीन, तसेच संशयित आरोपीकडे सापडलेली सुमारे ४३ हजार ५५० रुपये मिळून एकूण ९ लाख ६३ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ओमसाईराम व्हिडीओ गेम, साई दर्शन व्हिडीओ गेम, कुडाळेश्वर व्हिडीओ गेम, मुजीब व्हिडीओ गेम आणि म्युझिक व्हिडीओ गेम या व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई करण्यात आली असुन, सर्व व्हिडीओ गेम मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर यांनी दिली.
ही कारवाई कऱ्हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड, प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र भांड, हवालदार गणेश चव्हाण, कृष्णा केसरकर यांच्या पथकाकडून करण्यात आली.
विविध संघटनांच्या वतीने आल्या होत्या तक्रारी
याबाबतची माहिती कुडाळ तसेच जिल्ह्यातील विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्या ठिकाणी व्हिडीओ गेमच्या नावावर जुगार खेळला आहे. त्यातून आर्थिक व्यवहार होत आहे, अशी तक्रार होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली, असे गणेश कऱ्हाडकर यांनी सांगितले.