कोकणात दर्शन गणरायाचे; लक्ष्य आगामी विधानसभेचे
By admin | Published: August 29, 2014 10:42 PM2014-08-29T22:42:05+5:302014-08-29T23:09:35+5:30
विधानसभेची रंगीत तालीमच मानली
अनंत जाधव - सावंतवाडी.. कोकणात गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. अनेक चाकरमानी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गावी येत असतात. त्यातच पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्याने अनेक उमेदवार सध्या गणपती दर्शनासाठी घरोघरी फिरत असून, त्यानिमित्ताने का होईना, मतदार राजाला किंमत आली आहे. ही एक गणेशोत्सवाच्या निमित्ताने विधानसभेची रंगीत तालीमच मानली जात आहे. उमेदवार जरी दर्शन गणरायाचे घेत असले, तरी त्यांचे लक्ष्य विधानसभा असल्याचे दिसून येत आहे.
कोकणात गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनेक मुंबईकर चाकरमानी गणपती उत्सवानिमित्त गावी येतात. यावर्षीच्या गणपती उत्सवाचे महत्त्व काहीसे वेगळे आहे. यावर्षी ऐन गणेशोत्सवाच्या काळातच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व इच्छुकउमेदवार गणपती उत्सवाचे निमित्त करून प्रत्येकाच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेणार आहेत. साधारणत: गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासून हा दर्शनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. सावंतवाडीत यावर्षी निवडणुकीचे वातावरण जिल्ह्यातील निवडणुकांपेक्षा वेगळे आहे. महायुतीकडून दीपक केसरकर, मनसेकडून परशुराम उपरकर रिंगणात असून आघाडीचा उमेदवार अद्याप ठरायचा आहे. त्यातच माजी आमदार राजन तेली, शिवराम दळवी, संदेश पारकर, बाळा गावडे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले ही मंडळीही सावंतवाडीतून लढण्यास इच्छुक असल्याने सावंतवाडी मतदार संघातील मतदार राजाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तीन तालुक्यात विस्तारलेला हा मतदारसंघ तसा मोठा आहे. त्यामुळे उमेदवारांची गणपती दर्शनासाठी फिरताना चांगलीच दमछाक होणार आहे. तरीही निवडणुकीत मतदारराजा सर्वात मोठा असतो आणि त्याला भेटण्याची ही नामी संधी असल्याने सर्वच राजकीय पक्ष गणपती दर्शनासाठी आतुरलेले दिसून येत आहेत.
दीपक केसरकर हे चतुर्थीच्या तिसऱ्या दिवसापासून दर्शन सुरू करणार आहेत. तर परशुराम उपरकर व राजन तेली दुसऱ्या दिवसापासूनच कार्यकर्त्यांकडे गणपती दर्शन घेणार आहेत. यावर्षी निवडणुका म्हटल्यावर गणपती दर्शनाचा मनोदय सर्वच नेते व्यक्त करीत आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघातून वैभव नाईक, कणकवली मतदारसंघातून आमदार प्रमोद जठार, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे, आमदार विजय सावंत यांचाही इच्छुकांमध्ये समावेश असल्याने त्यांचाही यात समावेश आहे.