गंधर्व शास्त्रीय संगीत सभेत स्वरांची मुक्त उधळण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 02:05 PM2019-12-28T14:05:27+5:302019-12-28T14:07:02+5:30
आशिये येथील श्री दत्तक्षेत्र येथे आयोजित ३६ व्या संगीत सभेत कोलकत्ता येथील कौस्तुव कांती गांगुली (पद्मश्री पं.अजय चक्रवर्ती यांचे शिष्य) यांनी स्वरांची मुक्त उधळण केली . त्यांच्या गायनात रसिक अगदी चिंब होऊन गेले.
सुधीर राणे
कणकवली : येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्हयात अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचार करण्यासाठी जानेवारी २०१७ पासून गंधर्व मासिक संगीत सभेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येत आहे .त्याचाच एक भाग म्हणून आशिये येथील श्री दत्तक्षेत्र येथे आयोजित ३६ व्या संगीत सभेत कोलकत्ता येथील कौस्तुव कांती गांगुली (पद्मश्री पं.अजय चक्रवर्ती यांचे शिष्य) यांनी स्वरांची मुक्त उधळण केली . त्यांच्या गायनात रसिक अगदी चिंब होऊन गेले.
कौस्तुव गांगुली यानी मैफिलिची सुरुवात कर्नाटक संगीतातील राग 'चारूकेशी'ने केली.विलंबित,मध्य व दृत तालातील सादरीकरणाने रसिक भारावून गेले. आलाप,ताना,अभ्यासपूर्ण मांडणी ,समेवर येण्याची हातोटी,पतियाळा व अन्य घराण्यांच्या गायकीचा मिलाफ अशा वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणाने श्रोते अगदी सुखावले .
याच कार्यक्रमाच्या सुरुवातीला २०१९ युवा गंधर्व सन्मान डॉ. कौस्तुव गांगुली यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार साबाजी पोलाजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा सन्मान भालचंद्र खानोलकर यांच्या स्मरणार्थ दामोदर खानोलकर यांनी पुरस्कृत केला होता.
प्रास्ताविक केल्यानंतर प्रसाद घाणेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीला कौस्तुव गांगुली यानी अत्यंत अभ्यासपूर्ण रितीने उत्तरे दिली. त्यांनी यावेळी घरातून मिळालेली प्रेरणा,गुरु सानिध्य,शैक्षणिक व सांगितिक समांतर अभ्यास,मनाची एकाग्रता,भूप , देसकार,पुरिया ,मारवा ,देस, तिलककामोद या सारखे जवळ असणारे राग ,त्यांच्यातील साम्य व फरक सुंदरपणे विशद करून रसिकांना एक अनोखी मेजवानी दिली.त्यांचे वडिलही यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गंधर्व सभा उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कौस्तुव गांगुली यांनी मैफिलिची सांगता ठुमरी व भजन स्वरुपातील 'दया भवानी'या सुप्रसिद्ध भैरवीने केली.त्याना तबलासाथ रामकृष्ण उर्फ प्रसाद करंबेळकर (पं.रामदास पळसुले यांचे शिष्य)व हार्मोनियम साथ हर्षल काटदरे, चिपळूण(पं.विश्वनाथ कान्हेरे यांचे शिष्य) व तानपुरा साथ प्रियंका मुसळे यानी उत्कृष्टरित्या केली.
दामोदर खानोलकर यांनी मान्यवरांचे व कलाकारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. ही गँधर्व सभा यशस्वी होण्यासाठीयळ शाम सावंत, अभय खडपकर,मनोज मेस्त्री,संतोष सुतार,किशोर सोगम,दामोदर खानोलकर,विलास खानोलकर,सागर महाडिक,विजय घाटे,अनंत बडे,संदीप पेंडूरकर,मयूर कुलकर्णी, करंबेळकर कुटुंबीय,प्रसाद कुलकर्णी, गुरुवर्य बाळ नाडकर्णी , बापू डांबे, सुनील आजगावकर, संजय कात्रे आदींनी विशेष मेहनत घेतली.या सभेसाठी संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
३७ वी संगीत सभा २६ जानेवारी रोजी !
आशिये येथे २६ जानेवारी रोजी ३७ वी गंधर्व संगीत सभा होणार आहे. कुडाळ येथिल संगीत अलंकार ईश्वरी तेजम (नुतन परब)यांचे गायन यावेळी होणार आहे. या संगीत सभेचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गंधर्व फाऊंडेशन वतीने करण्यात आले आहे!