आशिये येथे गंधर्व संगीत सभा : सचिन तेली यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:06 PM2020-02-21T12:06:03+5:302020-02-21T12:07:50+5:30

गुरूंकडून मिळालेली जोमदार शिस्तबद् तालीम, सादरीकरणातील सच्चेपण, तालावर असलेली नैसर्गिक पकड, स्वरांचा सौंदर्यपूर्ण विचार या गोष्टी सचिन तेली यांच्या गायकीत रसिकांना जाणवल्या. त्यांनी आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना अगदी मंत्रमुग्ध केले.

 Gandharva Music Meeting in Asia: Sachin Telly's Enchanted Spells! | आशिये येथे गंधर्व संगीत सभा : सचिन तेली यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध !

आशिये येथे गंधर्व संगीत सभेत सचिन तेली यांनी सुमधुर गायन केले.

Next
ठळक मुद्दे आशिये येथे गंधर्व संगीत सभा सचिन तेली यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध !

सुधीर राणे

कणकवली : गुरूंकडून मिळालेली जोमदार शिस्तबद् तालीम, सादरीकरणातील सच्चेपण, तालावर असलेली नैसर्गिक पकड, स्वरांचा सौंदर्यपूर्ण विचार या गोष्टी सचिन तेली यांच्या गायकीत रसिकांना जाणवल्या. त्यांनी आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना अगदी मंत्रमुग्ध केले.

निमित्त होते ते आशिये येथे गंधर्व फाऊंडेशनतर्फे आयोजित मासिक शास्त्रीय संगीत सभेचे. डॉ. शशांक मक्तेदार यांचे शिष्य असलेल्या सचिन तेली यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाने रसिकांची मने जिंकली.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायन व उपशास्त्रीय प्रकारामध्ये अभंग , नाट्यपदे त्यांनी सादर केली. सचिन तेली यांनी राग' श्री 'मध्ये विलंबित व द्रुत ख्याल गायन करून त्यानंतर 'केदार' रागामध्येही दोन बंदिशी सादर केल्या. 'नाम जपन को छोड दिया ' हे हिंदी भजन, पटदीप रागातील ' मर्म बंधातली ठेव 'हे नाट्यपद व त्यानंतर विठ्ठलाचा अभंग भैरवी रागात सादर करून मैफिलीची सांगता केली.

यावेळी संजय कात्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत सचिन तेली यानी समर्पक उत्तरे दिली. त्यांच्या जगण्यातील साधेपणा, गुरुवरील निष्ठा व विश्वास आणि शास्त्रीय संगीताप्रती समर्पण ह्या गुणांचा प्रत्यय रसिकांना यानिमित्ताने आला.

आपल्या उत्तरातून तेली यांनी संगीतकला, गुरु मार्गदर्शन, नव्या पिढीकडून अपेक्षा, पालकांची जबाबदारी, नियमित रियाज , संगीत श्रवण इत्यादीबद्दल अभ्यासपूर्ण विचार मांडले. बोल, आलापी, ताना, लयकारी यांचे सादरीकरण प्रात्यक्षिक दाखविले.

त्यांना तबलासाथ सुप्रसिद्ध तबलावादक अमर मोपकर आणि संवादिनीसाथ प्रसाद गावस यांनी केली. तानपुरा साथ अथर्व पिसे याने केली. यावेळी कलाकारांचे स्वागत संगीत रसिक भूषण बुचडे यांच्या हस्ते करण्यात आले.

सचिन तेली यांनी गोवा कॉलेज ऑफ म्युझिक येथून मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट हि पदवी संपादन केली आहे. ते गांधर्व महाविद्यालयाचे अलंकार पदवीप्राप्त युवा गायक आहेत. त्यांना अनेक स्पर्धामधून पारितोषिके मिळाली आहेत.

सचिन तेली हे आकाशवाणी बी प्लस हाय ग्रेड शास्त्रीय संगीत गायक आहेत. अनेक महोत्सवामध्ये त्यांचे गायन झाले असून सध्या ते गोवा कला अकादमी येथे शास्त्रीय संगीताचे गुरु म्हणून कार्यरत आहेत.

रसिकांसाठी मोफत असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन वार्षिक रसिक सभासदांच्या सहकार्याने झाले. हि सभा यशस्वी होण्यासाठी संदीप पेंडुरकर, अभय खडपकर,मनोज मेस्त्री,दामोदर खानोलकर,सागर महाडिक, विलास खानोलकर, संतोष सुतार, किशोर सोगम,शाम सावंत, विजय घाटे, संजय कात्रे, करंबेळकर परिवार यानी विशेष परिश्रम घेतले. या सभेसाठी संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

३९ वी संगीत सभा २२ मार्च रोजी

रत्नागिरीतील युवा संतूर वादक मनाली बर्वे आपल्या वादनाने ३९ वी संगीत सभा २२ मार्च रोजी सजवणार आहेत. या पर्वणीचा संगीत प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन गंधर्व फाऊंडेशनतर्फे यावेळी करण्यात आले.

Web Title:  Gandharva Music Meeting in Asia: Sachin Telly's Enchanted Spells!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.