गांधीवादी विचारसरणी आत्मसात करणे गरजेचे : कलानंद मणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 03:56 PM2017-10-03T15:56:52+5:302017-10-03T15:57:22+5:30
अशांती दूर करण्यासाठी जात विरहीत समाजपद्धती, शांतीमय समाज, सर्वधर्म सलोखा ही गांधीवादी विचारसरणी आत्मसात करणे गरजेचे आहे. सध्याच्या नव्या जगाला दिशा देण्याचे सामर्थ्य गांधीजींच्या विचारसरणीमध्ये आहे, असे मत गोवा येथील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत कलानंद मणी यांनी कणकवली येथे व्यक्त केले.
कणकवली , दि. ३ : अनेक गावे लुप्त होऊन त्यांचे शहरात रुपांतर होत आहे. एका बाजूने वैभव सामावले आहे, तर दुसºया बाजूने संघर्ष, अशांती आहे. ही अशांती दूर करण्यासाठी जात विरहीत समाजपद्धती, शांतीमय समाज, सर्वधर्म सलोखा ही गांधीवादी विचारसरणी आत्मसात करणे गरजेचे आहे. सध्याच्या नव्या जगाला दिशा देण्याचे सामर्थ्य गांधीजींच्या विचारसरणीमध्ये आहे, असे मत गोवा येथील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत कलानंद मणी यांनी येथे व्यक्त केले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कलानंद मणी यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी ते साबरमती ‘बा-बापू’ ही निघालेली यात्रा सोमवारी गोपुरी आश्रम येथे आली. यावेळी कलानंद मणी बोलत होते.
यावेळी दिल्लीचे रमेश शर्मा, डॉ. जेकॉब, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, हरिहर वाटवे, लक्ष्मण गायकवाड, नरेश भाई आदी गांधीवादी विचारवंत कार्यकर्त्यांसमवेत गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, अर्पिता मुंबरकर, मुरादअली शेख व राष्ट्रसेवा दलाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी रमेश शर्मा म्हणाले, सध्याची जीवनशैली ही भोगवादी जीवनशैली आहे. गांधीजींचे विचार युवावर्गाने समजून घेणे गरजेचे आहे. वर्तमान जग अशांती, संघर्ष यांच्या वणव्यात गुरफटले असताना गांधीजींचे विचार शांतता, सद्भाव, अहिंसा आणि परस्पर सहजीवनाचा संदेश देणारे आहेत. हे विचार म्हणजे भविष्यातील पिढीला वैचारिक स्पष्टतेचे अधिष्ठान आहे. तरूण पिढीने विकासाचे प्रकल्प राबविताना चिरस्थायी विचार करून राबवावेत. युवावर्गापर्यंत गांधीजींचे विचार पोहोचविण्याच्या हेतूने ‘बा-बापू’ ही यात्रा काढण्यात येत आहे. समाजातील सज्जन शक्ती सक्रिय होण्याच्या दृष्टीने आम्ही यात्रेतून प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
वैशाली पाटील म्हणाल्या, नैसर्गिक वातावरणाचा विचार समाजपातळीवर होत आहे. भविष्यात पर्यावरण वाचवायचे असेल तर गांधीवादी विचार आवश्यक आहेत. कोकणात मायनिंग, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, जागतिकीकरण, खासगीकरणाचे प्रश्न आहेत. याविषयी समाजपातळीवर अनेक लढे सुरू आहेत. या लढ्यांना हिंसक वळण न देता गांधीजींच्या विचाराने लढून त्यावर विजय प्राप्त करावा. सरकारच्या चुका गांधीमार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करावा.
गोपुरी आश्रमाच्या उपक्रमांमध्ये गांधीवादी विचारांचा स्पर्श आहे. राष्ट्रसेवा दलात युवक-युवतींचा सहभाग पाहता पुढील पिढीसाठी हीच या विचारांची आशा आहे. अनेक चळवळींसाठी गोपुरीसारख्या संस्था कार्यरत आहेत. हे समाजाच्या दृष्टीने हिताचे आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. जेकॉब म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या जाळ्याखाली युवा पिढी भरकटत आहे. याचा चांगला वापर केल्यास समाज घडविण्यात उपयोग होईल. त्यामुळे गांधीवादी मंडळींनी गांधीजींचे विचार युवापिढीपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.