जगाच्या राजकारणावर गांधीजींचा मोठा प्रभाव
By admin | Published: February 6, 2017 12:31 AM2017-02-06T00:31:35+5:302017-02-06T00:31:35+5:30
अनिल अवचट यांचे प्रतिपादन : वागदे येथील गोपुरी आश्रमात व्याख्यान
कणकवली : जगाच्या राजकारणात आज जी काही महत्त्वपूर्ण आंदोलने किंवा संघर्ष चालला आहे, त्यावर गांधीजींचा मोठा प्रभाव आहे. अगदी कृष्णवर्णीय बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्याच्या घटनेवरही गांधी विचारांचा प्रभाव आहे. भारताने जगाला काय दिले? असा प्रश्न उपस्थित झाला तर जगाला भारताने गांधीजी दिले, ही खूप महान गोष्ट आहे, हे आपण कदापीही विसरता कामा नये, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. अनिल अवचट यांनी येथे व्यक्त केले.
वागदे येथील गोपुरी आश्रमात शनिवारी ‘गांधी समजून घेताना’ या कार्यक्रमात डॉ. अनिल अवचट बोलत होते. यावेळी सिंधुरत्न फाऊंडेशनचे डॉ. मिलिंद कुलकर्णी, संत वाङ्मयाचे अभ्यासक अॅड. देवदत्त परुळेकर, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते अॅड. संदीप निंबाळकर, गोपुरी आश्रम समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर आदी उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी यांनी डॉ. अवचट यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉ. अवचट म्हणाले, मार्टीन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आदी जागतिक पातळीवरचे नेते हे गांधीजींना गुरू मानत. गांधीहत्येचे वृत्त ऐकून युरोपातील एका देशात असलेले मधु लिमये सैरभर झाले. सैरभैर अवस्थेत ते रस्त्यावरून फेऱ्या मारत होते. तेव्हा एक युरोपीयन माणूस त्यांच्याकडे आला आणि त्याने लिमये यांना विचारले ‘आर यू इंडियन?’ त्यावर लिमये यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्यावर त्यांच्या शर्टाला धरत गदागदा हलवीत त्या युरोपियनाने मधु लिमयेंना विचारले ‘व्हाय यू किल्ड गांधी?’ ‘तुम्ही गांधींना का मारले?’, ‘गांधी काय तुमच्या एकट्याचे होते काय?’, ‘आमच्या गांधींना का मारले तुम्ही?’, असं तो युरोपीयन विचारत होता. इतके गांधीजी महान होते. सध्याच्या वाढत्या चंगळवादाशी संबंधित प्रश्नांवर डॉ. अवचट म्हणाले, कबिरानेच आपल्या दोह्यांमध्ये सांगून ठेवलेय की नावेमध्ये पाणी आणि घरामध्ये धन भरणे म्हणजे धोकादायक असते. नावेत अधिक पाणी भरले की नाव बुडते. तसे घरात अधिक धन झाले, तर घरही बुडण्याचा धोका असतो. यासाठी ‘गरजे इतकेच’ हा गांधी विचार समजून घ्यायला हवा. गत सहस्त्रकातील श्रेष्ठ व्यक्तिमत्वांची निवड करण्याचे जगाने ठरविले तेव्हा अल्बर्ट आईनस्टाईन व महात्मा गांधी ही दोनच नावे अंतिम निवडीपर्यंत पोहोचली होती. अखेरीस आईनस्टाईनला काही मते जादा मिळाली होती. पण त्याच आईनस्टाईनने ‘कदाचित काही पिढ्यानंतर गांधीजी नावाचे थोर व्यक्तिमत्व जन्माला आले होते, ही जगाला दंतकथा वाटेल’ असे गांधीजींविषयी आदराने उदगार काढले होते. गांधींचे हे मोठेपण आपण समजून घ्यायला हवे, असे डॉ. अवचट यांनी यावेळी सांगितले. ‘गांधी समजून घेताना’ या कार्यक्रमाचे आयोजन अॅड. देवदत्त परुळेकर, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले होते. आभार प्रा. मुंबरकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. नितीन शेटये, मंगल परुळेकर, संकल्प प्रतिष्ठानचे मुरादअली शेख, व्ही. के. सावंत, लक्ष्मीकांत खोबरेकर, प्रसाद घाणेकर, अर्पिता मुंबरकर, विजया चिंडक उपस्थित होते.(प्रतिनिधी)