सिंधुदुर्गात गणेश मूर्तिशाळा गजबजल्या, मूर्तिकारांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:34 PM2019-07-29T13:34:04+5:302019-07-29T13:35:54+5:30
कोकणातील महत्त्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला अवघा सव्वा महिन्याचा कालावधी शिल्लक असून, कणकवली तालुक्यासह जिल्ह्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिशाळांमध्ये गजबजाट सुरू झाला आहे. श्री गणेशमूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे.
ओंकार ढवण
कणकवली : कोकणातील महत्त्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला अवघा सव्वा महिन्याचा कालावधी शिल्लक असून, कणकवली तालुक्यासह जिल्ह्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिशाळांमध्ये गजबजाट सुरू झाला आहे. श्री गणेशमूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे.
गणेशोत्सव येणार म्हणजे भाविकांचे मन उत्साहाने भरून जाते. या उत्सवाची तयारी दोन-तीन महिने अगोदरच सुरू होते. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने भात लावणीचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे.
गणेशोत्सवात श्री गणेश मूर्तीचे स्थान महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे सध्या गणेश मूर्तिशाळांमध्ये कारागिरांची लगबग सुरू आहे. वाढत्या महागाईमुळे गणेश मूर्तींच्या किमतीत यावर्षी वाढ झाली आहे. मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या शाडू मातीच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबरच रंग साहित्य, प्लास्टर आॅफ पॅरिस व अन्य साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत.
कामगारांच्या मजुरीचे दर वाढले असले तरी कुशल कारागिर मिळणे कठीण झाले आहे. सतत जोरदार पडणारा पाऊस, त्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक समस्यांच्या गर्तेत हा व्यवसाय सापडल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात गावोगावी गणेश मूर्तिशाळा असून, मूर्तिकारांना माती मळण्यापासून ते रंगकामापर्यंत कुटुंबीयांसह सर्व कामे करावी लागतात. गेल्या काही वर्षांत चांगले कारागिर मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे या कलेत पारंगत असलेल्या कलाकारांना सध्या प्रचंड मागणी आहे. त्यामुळे त्यांना ह्यवजनह्ण प्राप्त झाले आहे.
भाविकांकडून शाडूच्या मातीच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. मात्र, इंधन दरवाढ, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. गणेश मूर्तिशाळांमध्ये सध्या मूर्तिकार, कुशल-अकुशल कारागिर सध्या रात्रंदिवस कामात व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने लगबग सुरू आहे.