वेंगुर्लेत कातकरी समाजाकडून गणेशोत्सव

By admin | Published: September 7, 2016 11:50 PM2016-09-07T23:50:03+5:302016-09-07T23:52:50+5:30

शासनाच्या धोरणात्मक मदतीची गरज : शैक्षणिक प्रगतीतून समाज प्रवाहात सामील

Ganeshotsav from Vengurleet Katkari community | वेंगुर्लेत कातकरी समाजाकडून गणेशोत्सव

वेंगुर्लेत कातकरी समाजाकडून गणेशोत्सव

Next

प्रथमेश गुरव --वेंगुर्ले  -रानावनात भटकणारा आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी अहोरात्र कष्ट करणारा समाज म्हणून कातकरी समाजाची ओळख आहे. या समाजाचा सण म्हणजे दुर्मीळ गोष्टच. पण याच समाजामार्फत वेंगुर्लेत गेली आठ वर्षे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. उत्सवाच्या माध्यमातून विघ्नहर्त्याचे पूजन करून गणेशाप्रती असलेली अपार श्रद्धा, आदर व भक्ती यांचे दर्शन घडवित हा समाज सामाजिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात येत आहे.
भटक्या विमुक्त जातीत कातकरी म्हणून ओळखली जाणारी आदिवासी जमात आपल्याला ठिकठिकाणी पहायला मिळते. पूर्वी हा समाज जंगलात निरनिराळ््या प्राण्यांची शिकार करून ते प्राणी गावात आणून विकणे तसेच काजू-आंबा बागांची राखण करून आपला चरितार्थ चालवित असत. सध्या काजू-आंबा बागांखी राखण करण्याबरोबरच मजुरीची कामे करून कातकरी समाज चरितार्थ चालवितो. पण हा समाज सद्यस्थितीत समाजापासून आणि गावापासून काहीसा दूरच आहे.
तिरकामठ्याने उपद्रवी वानरे मारणे हा त्यांचा मुख्य पेशा. म्हणूनच कोकणात त्यांना ‘वानरमारे’ संबोधले जाते. मात्र, आता या समाजाला कातकरी समाज म्हणून ओळखले जाते. पूर्वी गावातील वानरांंचा उपद्रव कमी करण्यासाठी शहरात किंवा गावात वानरमाऱ्या व्यक्तीची नेमणूक असायची. तिरकामठ्याने अचूक लक्षवेध करून वानर मारणे हे या जमातीचे वैशिष्ट्य होते. वानरही त्यांना पाहिल्याबरोबर घाबरून दूर पळून जात असत. गावकुसाबाहेर असलेला समाज सणाच्यावेळी गावातून भिक्षा मागण्यापुरताच गावाशी संबंधित होता. तो आता छोटेमोठे कामधंदे करून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहे. त्यांची मुलेही आता शिक्षणापासून वंचित न राहता शिक्षण घेऊ लागली आहेत.
या समाजाने आता गणपतीचे पूजन करून भक्तीचा श्रीगणेशा गेली ८ वर्षे अविरत सुरू ठेवला आहे. वेंंगुर्ले कॅम्प येथे कातकरी समाजाची २० ते २५ कुटुंबे असून सरासरी स्त्री-पुरुष व मुलांसहीत ८० लोक याठिकाणी वास्तव्यास आहेत. इतर लोकांप्रमाणेच आपल्याकडेही गणेशोत्सव असावा असे या समाजाला मनोमन वाटत होते. मात्र, स्वत:ला रहायला चांगले घर नसल्याने गणपती कसा पूजायचा? असा प्रश्न त्यांना पडला होता. पुढे लवकरच दगडी बांधकामाचे घर उभे राहिले. त्यानंतर समाजातील काही लोकांनी पुढाकार घेऊन या कातकरी समाजातील लोकांकडे २००८ साली गणपती ठेवला.
कातकरी समाजातील लोकांनी या गणपतीची ब्राह्मणाकडून प्रतिष्ठापना करून घेतली. तेव्हापासून गणपती पूजनाची प्रथा सुरू झाली. गणपतीकडे सजावट करणे, वीज रोषणाई, माटवी बांधणे, नैवेद्यामध्ये मोदक हे सर्व इतर समाजाप्रमाणे या कातकरी समाजाच्या गणपतीपुढे दिसून येते. त्यांच्या वस्तीपासून जवळच असलेल्या घाडीवाडा येथे गणेशाची मूर्ती घडविण्यासाठी दिली जाते. चतुर्थीदिवशी वाजतगाजत हा गणपती आणून त्याची प्रतिष्ठापना केली जाते. सर्रास पाच दिवस, तर समाजातील एखादी व्यक्ती निवर्तल्यास दीड दिवस गणपतीचे पूजन करतात. घाडीवाडा येथील भक्तमंडळी आपल्या गणपतीबरोबरच या कातकरी समाजातील लोकांकडे जावून त्यांच्याही गणपतीला आरती, भजन करतात. गणपती विसर्जन सोहळा तर अवर्णनीयच असतो. गणपती विसर्जनादिवशीच्या जेवणामध्ये इतर पदार्थांबरोबरच खीर, सोजी आदी पदार्थ करतात. दुपारी एकत्रित भोजन झाल्यानंतर सायंकाळी या गणपतीचे विसर्जन केले जाते. विसर्जन मिरवणुकीला बॅण्ड पथकही सज्ज असते.


प्रशिक्षणाची गरज : शिक्षणातही प्रगती
कातकरी समाज शिक्षणापासून दूर असणारा समाज आहे. पण वेंगुर्लेतील कातकरी समाजातील महिला मात्र आपले मूल किमान दहावीपर्यंत शिकलेच पाहिजे, असा हट्ट आपल्या पतीजवळ धरत असल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे प्रगतीपासून दूर असणारा हा समाज शैक्षणिक प्रवाहात येत असून तो आगामी काळात समाजातील इतर घटकांप्रमाणे स्थिरावत आहे. इतर सुविधांबरोबरच त्यांना भक्कम निवारा मिळण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. उदय आईर या सामाजिक कार्यकर्त्याने वेताळबांबर्डे येथे कातकरी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत. मुलांच्या अंगी असलेल्या उपजत गुणांना प्रशिक्षण दिल्यास धावणे, उंचउडी, भालाफेक यासारख्या क्रीडास्पर्धेत मुले सहज यश मिळवू शकतात.


गरज समजून स्वीकारण्याची
रानावनात भटकत आपली गुजराण करणारा आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून हा समाज कित्येक वर्षे लांब होता. पण अलिकडील काही वर्षात हा समाज आता मुख्य प्रवाहात येवू पाहतोय. गरज आहे ती त्यांना समजून घेण्याची व आपण सर्वांनी त्यांना स्वीकारण्याची.

Web Title: Ganeshotsav from Vengurleet Katkari community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.