काँग्रेसच्या पंधरा कार्यकर्त्यांवर गुन्ह
By admin | Published: February 26, 2016 12:20 AM2016-02-26T00:20:11+5:302016-02-26T00:20:11+5:30
नाडकर्णी, जाधव, परब यांचा समावेश : दोडामार्ग बसस्थानक कामात अडथळाप्रकरणी कारवाई े
दोडामार्ग : येथील बसस्थानकाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली कामे दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जमाव करून बंद पाडली होती. त्याप्रकरणी पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग कणकवली विभागातील कनिष्ठ अभियंता सुरेश पांडुरंग बिले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकणी, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई, काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, माजी सभापती दयानंद धाऊसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस आदींसह पंधरा जणांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैरकायदा बेकायदा जमाव करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते येथील बसस्थानकाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम जाहीर झाल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामे पूर्ण करूनच उद्घाटन करा अन्यथा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा दिला होता. तसेच कधी अधिकाऱ्यांना घेराव घालून तर कधी ठिय्या धरून बसस्थानकाची सुरू असलेली कामे बंद पाडली होती. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना वेळेत कामे पूर्ण करण्यात अडचण आली.
त्या पार्श्वभूमीवर महामंडळ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार बिले यांनी पंधरा जणांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी तपास करीत
आहेत.