पाठलाग करून पकडली संशयितांची टोळी
By admin | Published: March 30, 2016 01:16 AM2016-03-30T01:16:49+5:302016-03-30T01:23:17+5:30
लाखोंची रोकड सापडली : कडवई येथील तरुणांचे धाडस; संशयित गुजरातची नावे आहेत.
देवरुख / आरवली : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे कडवईतील काही तरुणांनी संशयित चोरट्यांची टोळी लाखोच्या रोकडसह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. चित्रपटात शोभेल अशाच पद्धतीने हा थरारक पाठलाग करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री ९ ते ११ च्या सुमारास घडली. ही टोळी पकडणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पत्रकार मिलिंद चव्हाण, शैलेश चव्हाण, रिक्षा चालक विनायक तुळसणकर यांचे पोलिसांनी कौतुक केले.
सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास संगमेश्वरहून सावर्डा येथे भाडे घेऊन रिक्षाचालक सचिन जंगम हा चार व्यक्तींना घेऊन निघाला होता. प्रवासात या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सचिनच्या मनात भीती निर्माण झाली. म्हणून त्याने तुरळ रिक्षा स्टॅण्डला आपली रिक्षा थांबवून रिक्षाचालक विनायक तुळसणकर याच्याकडे मदत मागितली. तुळसणकर यांनी रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांना भ्रमणध्वनीवरून याबाबत माहिती दिली. चव्हाण यांनी आपण पोहोचेपर्यंत संबंधितांना थांबवून ठेवण्यास सांगितले. चव्हाण यांनी तत्काळ संगमेश्वर पोलिसांना याबाबतची कल्पना दिली. मात्र, मधल्या कालावधीत संबंधित चार संशयित पलायन करण्यात यशस्वी झाले.
दरम्यान जितेंद्र चव्हाण, शैलेश चव्हाण, मिलिंद चव्हाण, दीपक चौगुले, विनायक तुळसणकर यांनी ग्रामस्थांना कल्पना देऊन संबंधितांचा शोध चालू केला. याचवेळी संगमेश्वरवरून पोलिसांची
गाडीही तुरळ येथे दाखल झाली. गणपती मंदिर परिसरात पोलिसांना दोन संशयित सापडले. त्यांनीही पळण्याचा प्रयत्न केला होता; पण शैलेश चव्हाण यांनी त्यांना पाठलाग करून पकडले. पोलिस संबंधितांना घेऊन संगमेश्वर पोलिस ठाण्याकडे रवाना झाले.
याच दरम्यान रात्री १०.३० वाजता जितेंद्र चव्हाण, शैलेश चव्हाण, मिलिंद चव्हाण, विनायक तुळसणकर, दीपक चौगुले यांनी तुरळ मराठवाडी परिसरात संशयितांचा शोध घेतला असता ते पळण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. या तरुणांनी त्यांना पाठलाग करून पकडले आणि चोप दिला. त्यावेळी त्यांच्याजवळ १०० आणि ५०० च्या नोटांची लाखो रुपयांची रक्कम आढळली. शंकर बाबू ठाकू र (वय ४५, अलवानाका, बडोदा, गुजरात), मनू जगू बसिया ऊर्फ संतोष किसन ठाकूर (४५, अलवानाका, बडोदा), राजू देवा धनगर (४०, बेडद, जम्बूशहा, जि. बरूच, गुजरात) आणि यलूर मोहन माळी (४२, गामेण, गुजरात) अशी त्यांची नावे आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी तत्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक मनोहर चिखले यांना दिली. याबाबत संबंधितांजवळ चौकशी केली असता आपण शटरचे काम करणारे कामगार असून, सावर्डा येथे भवानी मंदिराजवळ राहतो. ही रक्कम आपण मालकाच्या गाडीतून चोरली असल्याचे कबूल केले.
या तरुणांनी दोन्ही संशयित आणि रोकड पोलिसांच्या स्वाधीन केली असून, पोलिस निरीक्षक मनोहर चिखले अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
चौकट
मोठे रॅकेट?
दरम्यान, हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, किती दिवसांपासून हे संशयित चोरटे असा प्रकार करीत होते, हे तपासात पुढे येणार आहे. या चोेरट्यांकडून कटावणी स्क्रू ड्रायव्हर, पाने, पक्कड या साहित्यशिवाय चोरीसाठी वापरावयाचे साहित्यदेखील ताब्यात घेतले आहे.
मध विक्रेते म्हणून आले अन्...
चिपळूण येथील प्रशांत अनंत जाधव (वय ३८, रॉयलनगर चिपळूण) हे गेली १६ वर्षे बिल्डिंगकरिता लागणाऱ्या वायरिंगची कामे ठेकेदार पद्धतीने घेत होते. त्यांच्याकडे शंकर ठाकूर व मनू बारिया हे दोघेजण गावठी मध विकण्यासाठी आले होते. सलग दोन तीनवेळा ते मध विकण्यासाठी आल्याने जाधव यांनी त्यांना याबाबत विचारले. त्यांनी देवरुखच्या जंगलात आम्ही लाकडे तोडत आहोत, तेथे आम्हाला मध मिळतो, असे सांगितले. काही दिवसांनी शंकर ठाकूर हा जाधव यांच्याकडे आला व त्याने आपल्या वडिलांना खोदकाम करताना सोने मिळाले आहे, ते विकायचे आहे, तुम्ही घेणार का? असे विचारले. त्याने एक सोन्याचा मणीही दिला. त्यानंतर सोन्याचा व्यवहार ठरला.