चमत्काराची ‘गंगा’ अजूनही प्रवाहीतच
By admin | Published: April 27, 2015 10:24 PM2015-04-27T22:24:46+5:302015-04-28T00:22:22+5:30
मूळ प्रवाह बंद : चौदापैकी तेरा कुंडात मात्र पाणीच पाणी
राजापूर : गेल्या तीन वर्षांच्या काळात राजापूरच्या या जगप्रसिध्द गंगामाईचे प्रवाहीत राहण्याच्या कालखंडाचे उच्चांकावर उच्चांक होत राहिले आणि राजापूरच्या गंगामाईचे आजपर्यंत विज्ञानालाही न सुटणारे कोडे कायम राहिले आहे. मात्र, आता चार महिन्यांपूर्वी मूळ गंगा उगम स्थानातून येणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला असला तरी उर्वरित चौदापैकी तेरा कुंडांमध्ये अद्याप पाणी असल्यामुळे हाही एक नवीनच चमत्कार मानला जात आहे.
राजापूरची गंगा अवतीर्ण झाल्यानंतर आपल्या अनिश्चित स्वरुपाच्या कालावधीतील वास्तव्यात गंगामाता हजारो भाविकांना स्नान घडवते. साधारणपणे तेराव्या शतकापासून नियमितपणे पण अनियमित काळाने प्रवाहरुप होऊन भक्तांच्या पापक्षालनासाठी राजापूरनजीकच्या उन्हाळे गावच्या डोंगरावर प्रकट होणारी गंगा म्हणजे सृष्टीदेवतेचा एक अद्भूत चमत्कारच मानला जातो. त्यामुळे आता मूळ गंगा अंतर्धान पावल्यानंतरही इतर तेरा कुंडांमध्ये असणारे गंगेचे पाणी हाही एक चमत्कारच मानला जात आहे.
दर तीन वर्षांनी प्रकट होणारी राजापूरची गंगा अंतर्धान पावल्यानंतर मूळ गंगा कुडांपाठोपाठ इतर तेरा कुंडेही कोरडी पडतात. मात्र, यावेळी मूळ गंगा प्रवाह जानेवारी महिन्यात बंद झाला असला तरी आजपर्यंत गंगाक्षेत्रावरील चंद्र्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुनाकुंड, सरस्वती कुंड, गोदावरी कुंंड, कृष्णकुंड, नर्मदा कुंड, कावेरी कुंड, अग्निकुंंड, भिमा कुंड, चंद्रभागा कुंंड यासह काशीकुंडामध्येही गंगाप्रवाह सुरु आहे. ही कुंडे अद्याप कोरडी पडलेली नाहीत. एरव्ही गंगा अंतर्धान पावल्यानंतर ऐन पावसाळ्याच्या काळातही ही सर्व कुंडे कोरडीच असतात. या कुंडांमध्ये जराही पाणी साचून राहात नाही. आजच्या घडीला काशीकुडांचे पाणी गोमुखातून वाहत नसले तरी काशीकुडांच्या मध्यभागी असणाऱ्या साधारण सात ते आठ फूट उंच भागामध्ये अद्याप पाणी आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वीपासून राजापुरात गंगा अवतीर्ण होत आहे. मात्र, तेव्हापासून असा चमत्कार कधी झाल्याच्या नोंदी इतिहासात आढळून येत नाहीत.
गंगा अंतर्धान पावल्यानंतर गंगाक्षेत्री असणारी सर्व कुंडे पूर्ण सुकून जातात, असाच प्रघात आहे. मात्र, मूळगंगा कुंडाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या चंद्रभागा कुंडामध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून सर्वकाळ पाणी राहायचे, असे गंगापूत्र सांगतात. मात्र, यावेळी हा नवीनच चमत्कार झाला आहे. राजापूरची गंगा हा एक अद्भूत चमत्कार मानला जात असून, आताच्या नवीन चमत्कारानेही भाविक नतमस्तक झाल्याशिवाय राहात नाहीत. (प्रतिनिधी)
चार महिन्यांपूर्वी मूळ गंगा उगम स्थानातून येणारा पाण्याचा प्रवाह बंद.
उर्वरित चौदापैकी तेरा कुंडांमध्ये अद्याप पाणी.
गंगा अंतर्धान पावल्यानंतर गंगाक्षेत्री असणारी सर्व कुंडे पूर्ण सुकून जातात, असाच प्रघात.
गंगेचा आणखी एक चमत्कार.