Ganpati Festival -कणकवलीत साकारल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 04:00 PM2020-08-21T16:00:47+5:302020-08-21T16:03:01+5:30

कणकवली विद्यामंदिर हायस्कुलचे कलाशिक्षक व मूर्तिकार प्रसाद राणे यांनी आपल्या कल्पकतेतून शाडू माती बरोबरच कागदी लगद्याच्या पर्यावरण पूरक मूर्ती यावर्षी साकारल्या आहेत. त्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Ganpati Festival - Environmentally friendly Ganesh idol made in Kankavali! | Ganpati Festival -कणकवलीत साकारल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती !

 कणकवली टेंबवाडी येथील मूर्ती शाळेत कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्तींना रंग देण्याचे काम प्रसाद राणे करीत आहेत.

Next
ठळक मुद्देकणकवलीत साकारल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती !प्रसाद राणे यांचा उपक्रम ; शाडू माती बरोबरच कागदी लगद्याचा वापर

कणकवली : गणेशोत्सवात घरोघरी सजावटी बरोबरच श्री गणेश मूर्तीलाही मोठे महत्व असते. त्यामुळे आपल्या घरातील श्री गणेशाची मूर्ती इतरांपेक्षा वेगळी असावी यासाठी अनेक भाविक प्रयत्नशील असतात. तर मूर्तिकारही आपली कला पणाला लावून गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही तरी नवनिर्मिती करीत असतात.

कणकवली विद्यामंदिर हायस्कुलचे कलाशिक्षक व मूर्तिकार प्रसाद राणे यांनी आपल्या कल्पकतेतून शाडू माती बरोबरच कागदी लगद्याच्या पर्यावरण पूरक मूर्ती यावर्षी साकारल्या आहेत. त्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

गणेशोत्सव सर्वत्र आनंदात तसेच उत्साहात साजरा केला जातो. सिंधुदुर्गामध्ये गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वच भाविक मोठया उत्साहात गणपती बाप्पाची मुर्ती घरी आणून तीची मनोभावे पूजा करतात. या गणेश मूर्ती तयार करण्याचे काम सिंधुदुर्गमध्ये ठीकठिकाणी सध्या सुरु आहे .

अनेक मूर्तीशाळामध्ये विविध रुपातील बाप्पा आकार घेत आहेत. अलीकडे अनेक मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरीसच्या रंगविलेल्या मुर्त्या किंवा दुसऱ्यांनी बनविलेल्या कोऱ्या मूर्त्यां बाहेरील जिल्ह्यातून आणून त्यांना रंग देताना दिसतात. मात्र, या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाची हाणी होत आहे. याकडे कोणाचेच लक्ष नसते.

परंतु अजूनही बरेच मूर्तिकार पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मूर्ती तयार करुन आपली पारंपारीक कला जोपासत आहेत.त्यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. असेच एक मूर्तीकार म्हणजे प्रसाद राणे होय. वडिलांकडून मूर्तिकलेचा लाभलेला वारसा त्यांनी पुढे सुरू ठेवला आहे. चित्रकला, मूर्तिकला याबरोबरच त्यांचे पर्यावरण संवर्धनाविषयीचे विविध उपक्रम सतत सुरू असतात. त्यामुळे त्यांना विविध संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन गौरविले आहे.

त्यांच्या कणकवली टेंबवाडी येथील गणेशमूर्ती शाळेत अवलोकन केले तर पर्यावरण पूरक मूर्तीचा वेगळेपणा दिसून येतो. कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या, वजनाला हलक्या व पूर्ण विघटनशील अशा पर्यावरण पूरक गणेश मूर्ती आपल्या गणेश मूर्ती शाळेमध्ये ते बनवितात .

शाडू मातीच्या पारंपरिक मुर्त्यां या वजनाला जड असतात. तरीही बरेच भाविक याच मुर्त्यांना पसंत करतात . त्यामुळे शाडू मातीच्या मूर्ती बनवितानाच चार वर्षापूर्वी प्रसाद राणे यांनी कागदी लगद्यापासून गणेश मूर्ती बनवायला प्रारंभ केला. त्यावेळी या मूर्ती पूजेला लावायला काही भाविक तयार नव्हते. परंतु या विषयी प्रचार, प्रसार केल्यामुळे आता लगद्याच्या गणेश मुर्ती स्विकारण्यास भाविकांनी सुरवात केली आहे. तर अनेकांची माणसिकता बदललेली जाणवते.असे राणे सांगतात.

दरवर्षी पेक्षाही यावर्षी कागदी लगद्याच्या गणेश मूर्तीची मागणी प्रसाद राणे यांच्याकडे वाढली आहे. दरवर्षी लगद्याच्या ४ ते ५ मूर्ती ते बनवायचे. परंतु यावर्षी मात्र २० ते २५ मूर्त्याची मागणी असल्याने त्यांनी तेवढ्या मूर्ती त्यांनी बनविल्या आहेत.

कणकवली विद्यामंदिर हायस्कुल तसेच अन्य शाळांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण सेवा योजना या विभागाच्यावतीने पर्यावरण पुरक गणेश मुर्त्या कशा बनवाव्यात व त्याचा फायदा काय ? याबाबत प्रसाद राणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात.

गेली ४ वर्षे कार्यशाळा घेऊन मुलांची व नागरिकांची मानसिकता बदलण्याचे कार्य ते करत आहेत . त्याचाच परिणाम म्हणून या वर्षी लगद्याच्या मूर्तीची मागणी वाढली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती अविघटनशील असल्याने त्यांचे विसर्जन पाण्यात व्यवस्थित होत नाही. त्यामुळे प्रदुषणही वाढते.

याउलट कागदी लगद्याच्या मुर्ती या पूर्ण विघटनशील आहेत. त्यातील कागदी लगदा व गम हे तर जलचर जीवाना खाद्य म्हणून उपयोगी पडतात. त्यामुळे शाडू मातीच्या किंवा कागदी लगद्याच्या पर्यावरण पुरक गणेश मूर्तीच भाविकांनी बनवाव्यात असे आवाहन राणे यांनी केले आहे.

पर्यावरण पूरक उपक्रमासाठी ५० टक्के रक्कम !

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठया उंचीच्या मूर्ती ऐवजी छोटया मूर्ती बनविण्याचे ठरविले आहे. गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत नियोजन केले आहे. तसेच वाचविलेल्या निधीतून सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच मुख्यमंत्री निधीला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे .

त्यामुळे आपणही तयार केलल्या कागदी लगद्याच्या पर्यावरण पूरक २५ मूर्त्यांच्या विक्रीमधून मिळणाऱ्या रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम ही पर्यावरण सेवा योजनेच्या विविध उपक्रमांकरीता वापरण्याचा संकल्प केला असल्याचे प्रसाद राणे यांनी सांगितले.
 

Web Title: Ganpati Festival - Environmentally friendly Ganesh idol made in Kankavali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.