Ganpati Festival : पर्यावरणपूरक सजावटीकडे भर, दुकाने सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:32 PM2018-09-12T13:32:20+5:302018-09-12T13:35:28+5:30
घराघरातून मखर सजावटीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. गणेशमूर्ती आकर्षक दिसण्यासाठी मखर सजावट केली जात आहे. बाजारातही मखर सजावट साहित्याची दुकाने सजली आहेत.
सुनील गोवेकर
आरोंदा : गणेश चतुर्थी सण जवळ आला की कोकणवासीयांच्या आनंदाला पारावर नसतो. या वार्षिक उत्सवात घर सजावटीबरोबरच गणपतीची आरास करण्याकडे प्रत्येकाचा लक्ष असतो. विद्युत रोषणाईबरोबरच महत्त्वाची असते मखर सजावट.
घराघरातून मखर सजावटीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. गणेशमूर्ती आकर्षक दिसण्यासाठी मखर सजावट केली जात आहे. बाजारातही मखर सजावट साहित्याची दुकाने सजली आहेत.
यावर्षी थर्माकोल व प्लास्टिकला पूर्णपणे बंदी असल्याने पर्यावरणपूरक मखर सजावट केली जाणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी मखरे कागदी पुठ्ठे, बांबू तसेच इतर साहित्यापासून बनविली जाणार असून, एक वेगळीच के्रझ निर्माण करण्याचा प्रयत्न घराघरातून केला जाणार आहे. आकर्षक मखरे बनविण्याच्या कामाला वेग आला असून, गणेश सजावटीमध्ये ही मखरे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
सिंधुदुर्गात घराघरात गणेश पूजन केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात मखरांची मागणी असते. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीपासूनच सजावटीच्या कामाची लगबग सुरू होत असल्याने दहा-बारा दिवस आधी बाजारातही मखरांची दुकाने थाटली जातात.
हा व्यवसायही बऱ्यापैकी चालत असल्याने छोट्या-मोठ्या शहरात तयार मखरांची दुकाने थाटली आहेत. या दुकानांतही मखरांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. कागदी पुठ्ठा, बांबू तसेच इतर विविध प्रकारच्या साहित्यापासून यावर्षी पर्यावरणपूरक इको फ्रेंडली मखरे पहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर सजावटीमध्ये विविधताही दिसून येणार आहे.
रोषणाईच्या साहित्य खरेदीवर भर
या सजावटीमध्ये मखरांबरोबरच महत्त्व असते ते माटवी सजावटीला. माटवी सजावटीसाठी लागणारे पारंपरिक साहित्य गोळा करण्याचीही लगबग सुरू झाली आहे. दोन दिवस आधीपासून माटवी सजावटीसाठी लागणारे साहित्य बाजारात उपलब्ध होत असून, साहित्य विक्रेत्यांबरोबरच खरेदी करणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
गणेशोत्सवात विद्युत रोषणाईलाही तेवढेच महत्त्व असून, रोषणाईचे साहित्य खरेदी करण्याकडेही गणेशभक्तांचा ओढा असतो. इलेक्ट्रिक साहित्याची दुकानेही गजबजू लागली असून, या दुकानांमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी इको-फ्रेंडली मखर
शासनाने थर्माकोल व प्लास्टिकवर बंदी घातल्याने यावर्षी इको-फ्रेंडली मखरे असणार आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्याबरोबरच कागदी पुठ्ठे, बांबू तसेच इतर साहित्यापासून मखरे बनविली जाणार असून, एक वेगळी कलाकुसर मखर बनविणाऱ्या कारागिरांकडून पहावयास मिळणार असल्याचे मळेवाड येथील प्रसिद्ध कारागीर दीपक चौगुले यांनी सांगितले.