Ganpati Festival : सिंधुदुर्गात उद्यापासून गणेशोत्सव, ३५ सार्वजनिक, ६८२९१ घरगुती गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:25 PM2018-09-12T13:25:37+5:302018-09-12T13:28:50+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार २९१ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार ३२६ ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

Ganpati Festival: Ganeshotsav from Sindhudurg, 35 public, 682 9 1 household Ganapati tomorrow | Ganpati Festival : सिंधुदुर्गात उद्यापासून गणेशोत्सव, ३५ सार्वजनिक, ६८२९१ घरगुती गणपती

गणेश मूर्तिशाळांमध्ये रात्रंदिवस काम सुरू असून गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कारागीर मग्न आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात उद्यापासून गणेशोत्सव, ३५ सार्वजनिक, ६८२९१ घरगुती गणपती गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण, जय्यत तयारी सुरू

सिंंधुदुर्गनगरी : सुखकर्ता... दु:खहर्ता अशी ख्याती असणाऱ्या लाडक्या बाप्पाचे आगमन गुरुवार १३ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाची जय्यत तयारी सर्वत्र सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार २९१ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार ३२६ ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

कोकणात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे आणि परगावी असणारे चाकरमानी आपापल्या गावी येतात. एक दिवसावर आलेला हा गणेशोत्सव श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा होतो.

आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला होणार आहे. प्रामुख्याने कोकणात घराघरात गणेशोत्सव श्रद्धेने साजरा होतो. मुंबई व अन्य ठिकाणी असलेले जिल्हावासीय चाकरमानी या निमित्ताने आपापल्या गावी येतात. दीड दिवसापासून ११ दिवसांपर्यंत म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत हा सण साजरा होतो.

काही नवसाचे गणपती अनंत चतुर्दशीनंतरही थांबतात. हा सण सुरळीत व शांततेत पार पडावा यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन खबरदारी घेत असून यानिमित्त वाढलेली वाहतूक सुरळीत रहावी यासाठी प्रशासनाचा कटाक्ष असतो. रेल्वेनेही यावर्षी मोठ्या प्रमाणात गणपतीसाठी खास गाड्या कोकणात सोडल्या आहेत.

याशिवाय मुंबई-गोवा महामार्गावर खासगी व एसटीची बससेवा तसेच आपापल्या खासगी वाहनातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी भाविक दाखल होत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानके, बस स्थानके या गर्दीने फुलली आहेत.

जिल्ह्यातील बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. गणपतीच्या शाळा गजबजल्या असून मूर्तिकार मूर्तिवर अखेरचा हात फिरविण्याच्या गडबडीत आहेत. काही गणपती शाळांमधून तर बाप्पाला आपल्या घरी नेण्याचे काम सुरू झाले आहे.

वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून व भाविकांना आपल्या घरी सुरक्षित पोहोचता यावे म्हणून पोलीस प्रशासनाने यावर्षी चांगले नियोजन केले आहे. ४३ ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार असून त्याठिकाणी १८१ पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात असणार आहेत.

यात १७ फिक्स पॉर्इंट असून त्यावर ६८ कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. ९ राहुटी पॉर्इंट असून त्यावर ५४ कर्मचारी तैनात, ७ ठिकाणी जीप पेट्रोलिंग असणार असून त्यासाठी २६ कर्मचारी तैनात तर १० ठिकाणी दुचाकी पेट्रोलिंग असणार असून त्याठिकाणी ३४ कर्मचारी तैनात असणार आहेत. काही ठिकाणी वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

सिंधुदुर्ग राजासह ३५ ठिकाणी सार्वजनिक गणपती

कुडाळ येथील सिंधुदुर्गचा राजा यासह ३५ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव होत आहे. यामध्ये दोडामार्ग ५, बांदा २, वेंगुर्ला ३, कुडाळ ६, सावंतवाडी ८, मालवण २, आचरा १, कणकवली ७ आणि देवगड १ असे ३५ सार्वजनिक गणेशोत्सव त्या त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होत आहेत.

सावंतवाडीत सर्वाधिक ९७0४ घरगुती गणपती

घरगुती गणेशोत्सवामध्ये दोडामार्गमध्ये ४८३२, बांदा २५८०, वेंगुर्ला ४९५५, कुडाळ ८६३९, सावंतवाडी ९७०४, निवती ३२६९, सिंधुदुर्गनगरी २२९५, मालवण ४६९०, आचरा २४२५, कणकवली ९६२०, देवगड ६६७९ तर विजयदुर्ग ३२६३ अशी ६८ हजार २९१ कुटुंबे गणरायाचे पूजन करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे.
 

Web Title: Ganpati Festival: Ganeshotsav from Sindhudurg, 35 public, 682 9 1 household Ganapati tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.