Ganpati Festival -कणकवलीचे भूषण वैशिष्ठपूर्ण असा 'संतांचा गणपती ' !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 02:32 PM2020-08-27T14:32:35+5:302020-08-27T14:36:54+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली टेंबवाड़ी येथे संत पायाजी बाळाजी सावंत यांनी स्थापन केलेला 'संतांचा गणपती ', कणकवलीचे भूषण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणरायाची गणेश चतुर्थी दिवशी विधिवत स्थापना केल्यानंतर या परिसरातील संपूर्ण वातावरणच जणू भक्तिरसाने भारावून जाते.

Ganpati Festival -Kankavali's Bhushan is a special 'Ganpati of Saints'! | Ganpati Festival -कणकवलीचे भूषण वैशिष्ठपूर्ण असा 'संतांचा गणपती ' !

कणकवली टेंबवाडी येथील संतांचा गणपती !

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवलीचे भूषण वैशिष्ठपूर्ण असा 'संतांचा गणपती ' !वातावरण गेले भक्तिरसाने भारावून

सुधीर राणे

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली टेंबवाड़ी येथे संत पायाजी बाळाजी सावंत यांनी स्थापन केलेला 'संतांचा गणपती ' वैशिष्टयपूर्ण असाच आहे. कणकवलीचे भूषण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणरायाची गणेश चतुर्थी दिवशी विधिवत स्थापना केल्यानंतर या परिसरातील संपूर्ण वातावरणच जणू भक्तिरसाने भारावून जाते.

सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणात गणेशोत्सवाला फार मोठे महत्व आहे. या गणेशोत्सवात अनेक घरात गणरायाचे पूजन केले जात असले तरी संतांच्या या गणपती कडील वातावरण तसेच तेथे दर्शनासाठी उपस्थित असलेल्या भाविकांचा उत्साह पाहिला की या घरगुती गणपतीला सार्वजनिक गणेशोत्सवासारखे स्वरूप आल्याचे आपल्या लक्षात येते.

संत पायाजी सावंत यांचे नातू जगन्नाथ महादेव सावंत यांच्या कुटुंबियांबरोबरच कणकवली शहरातील अनेक भाविक तसेच नागेश्वर मित्रमंडळाचे कार्यकर्ते कणकवलीचे भूषण असलेल्या या गणरायाची अनंत चतुर्दशी पर्यंत आपापल्या परीने सेवा करीत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात दिवसांनी या गणरायाला निरोप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

' संतांच्या ' या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे मातीच्या एकवीस गोळ्यांपासून दरवर्षी या गणेश मूर्तीची निर्मिती केली जाते. कणकवली टेंबवाड़ीबरोबरच शहरातील बाल गोपाळ मंडळी आपल्या कला नैपूण्यातून ही मूर्ती बनवितात. सुमारे सहा फुट उंच असलेली व उंदरावर विराजमान झालेली ही गणेश मूर्ती अत्यंत सुबक दिसते.

साधारणतः श्री गणेशाचे दोन रंग असतात. एक म्हणजे केशरी रंग हा श्री गणेशाचे तारक रूप दर्शवितो , तर लाल रंग हा शक्तीच्या म्हणजेच मारक रूपाच्या उपासनेचा आहे. संतांच्या या गणपतीच्या संपूर्ण शरीराला लाल रंग असतो. त्याच्या लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची पवित्रके मूर्तिकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होतात. तसेच मूर्ती जागृत व्हायला मदत होते. असे या गणपतीच्या रंगाबद्दल सांगितले जाते.

संपूर्ण शरीराला लाल रंग, पीतांबर परिधान केलेली, डोक्यावर सोनेरी मुकुट व कानावर पोपट धारण केलेली अशी संतांच्या गणपतीची मूर्ती बनविलेली असते. ही मूर्ती घरीच म्हणजे टेंबवाड़ी येथील सावंत कुटुंबियांच्या श्री गणेश मंदिरात बनविली जाते.

दरवर्षी श्री गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशीपर्यंत चालणाऱ्या येथील गणेशोत्सवात अनेक धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. अनंत चतूर्दशीच्या आदल्या दिवशी संपूर्ण रात्र हरिनामाने रंगून निघते. रात्रभर विविध भजनी मंडळे भजनामध्ये तर कणकवली शहरातील काही मंडळे श्रींच्या आरती मध्ये दंग झालेली येथे पहावयास मिळतात.

या दिवशी परंपरेप्रमाणे श्री गणपतीचा प्रसाद म्हणून दुधात इतर साहित्य घालून बनविलेली 'भांग' दिली जाते. जिला 'सब्जी' असेही संबोधले जाते. तर त्याच्या जोड़ीला करंजीही भाविकाना देण्यात येते. यावर्षी या संतांच्या गणपतीला अनंत चतुर्दशी दिवशी निरोप न देता सात दिवसांनी म्हणजे शुक्रवारी दिला जाणार आहे.

संतांच्या गणपतीची पूर्वपीठिका !

सावंतवाड़ी तालुक्यातील कुणकेरी गावातील मूळ रहिवासी असलेले संत पायाजी बाळाजी सावंत विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. पायी चालत पंढरीची वारी करण्यात त्यांचे संपूर्ण आयुष्य गेले. ज्यावेळी ते पंढरपुरला पायी जात असत त्यावेळी कणकवली बसस्थानका शेजारील सोनगेवाडी येथे त्यांचा मुक्काम असे. संत पायाजी सावंत यांची तेथे कीर्तने तसेच प्रवचने होत असत. कणकवलीतील राणे(पटेल) तसेच इतर गावकरी मंडळीनी त्यांना टेंबवाड़ी येथे निवास करण्याची विनंती केली. या विनंतीला मान देवून संत पायाजी सावंत यांनी टेंबवाड़ी येथे वास्तव्य केले.

त्यानंतर प.पू.साटम महाराज यांच्या सांगण्यावरून संत पायाजी सावंत यांनी टेंबवाड़ी येथे गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून संतांचा गणपती अशी त्याची सर्वत्र ख्याती झाली.
टेंबवाड़ीवासियांबरोबरच शहरातील अनेक भाविक या गणपतीच्या सेवेत आपले योगदान दरवर्षी देत असतात. त्यामुळे हा बालगोपाळांचा गणपती म्हणून ही ओळखला जातो.

मोठ्या लाकड़ी मंचकावर विराजमान झालेल्या या गणरायाची विसर्जन मिरवणूक ही थाटात निघते. वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असताना परंपरेप्रमाणे भाविक खांद्यावरुन लाकड़ी मंचकासह श्री गणेश मूर्ती जानवली नदिवरील गणपती सान्यावर विसर्जनासाठी घेऊन जातात. मात्र, यावर्षी शासनाच्या सूचनांचे पालन करीत विसर्जन केले जाणार आहे.

Web Title: Ganpati Festival -Kankavali's Bhushan is a special 'Ganpati of Saints'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.