Ganpati Festival : गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या, कणकवलीसह सावंतवाडीत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:45 PM2018-09-12T13:45:22+5:302018-09-12T13:47:58+5:30

श्री गणरायाच्या आगमनासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने कणकवलीसह सावंतवाडी शहरातील आठवडा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. सजावटीचे साहित्य, किराणा माल, फळबाजार, विद्युत तोरणे आदींचा बाजार तेजीत होता. तसेच प्रत्येक वस्तूला महागाईची झळ बसल्याचीही चर्चा ग्राहकांत रंगली होती.

Ganpati Festival: markets to welcome Ganaraya, with the Kankavali crowd in Sawantwadi | Ganpati Festival : गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या, कणकवलीसह सावंतवाडीत गर्दी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती.

Next
ठळक मुद्देगणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या, कणकवलीसह सावंतवाडीत गर्दी फळबाजार तेजीत, प्रत्येक वस्तूला महागाईची झळ

कणकवली : श्री गणरायाच्या आगमनासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने कणकवलीसह सावंतवाडी शहरातील आठवडा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. सजावटीचे साहित्य, किराणा माल, फळबाजार, विद्युत तोरणे आदींचा बाजार तेजीत होता. तसेच प्रत्येक वस्तूला महागाईची झळ बसल्याचीही चर्चा ग्राहकांत रंगली होती.

बुधवारी हरितालिका व्रत असून याच दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हरितालिकेसाठी नारळाची शहाळी महत्त्वाची असल्याने किनारपट्टी भागातून तसेच केरळ, कर्नाटक येथून आलेल्या शहाळ्यांनी बाजारपेठ व्यापली होती. एका शहाळ्यासाठी चाळीस ते पन्नास रुपये दर लावला जात होता. काही ठिकाणी याहूनही चढे दर आकारले जात होते.

श्रावण महिन्यात वाढलेले फळांचे दरही चढेच राहिले आहेत. सफरचंद, मोसंबी, डाळिंब यांचे दर सरासरी शंभर ते दोनशे रुपये किलो एवढे होते. चांगली केळी पन्नास तर इतर केळी चाळीस रुपये डझनानेच घ्यावी लागत होती. तांदूळ, विविध प्रकारच्या डाळी, वाटाणे, शेंगतेल, पामतेल तसेच विविध कडधान्ये आदींना मोठी मागणी आहे.

श्री गणरायाच्या सजावटीसाठी कापड विक्रेत्यांनी विविध प्रकारचे पडदे उपलब्ध केले असून, त्यासाठीची चोखंदळ खरेदी ग्राहकांतून केली जात होती. याखेरीज विद्युत रोषणाईची दुकानेदेखील गर्दीने फुलली होती. समई, पंचारती यांचा समावेश असलेली भांड्याची दुकाने, विविध प्रकारच्या कपड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी होती.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या संख्येने मुंबईहून चाकरमानी दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी रेल्वे प्रशासनाने जादा रेल्वेगाड्या सोडल्याने प्रवाशांची सोय झाली. गेल्या दोन दिवसांत हजारो चाकरमानी जिल्ह्यात आल्याने येथील बाजारपेठांत मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शहर तसेच ग्रामीण भागातील हॉटेल व्यवसायही तेजीत आहे. दरम्यान, शहरवासीयांपेक्षा ग्रामीण भागातून किराणा व इतर साहित्याला मागणी असल्याने या व्यावसायिकांची उलाढाल वाढली आहे.

महागाईचा फटका, काटकसरीने तोडगा

दिवसेंदिवस महागाई वाढत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे जनतेचा जीव अगदी मेताकुटीस आला आहे. पण आपल्या लाडक्या गणरायाच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असून काटकसरीने महागाईवर तोडगा काढला जात असल्याचे चित्र बाजारपेठेत पहायला मिळत आहे.

याखेरीज आरती, भजनांसाठी लागणाऱ्या तबला-मृदुंग, ढोलकी अशा तालवाद्यांच्या दुकानांमध्ये काम हातावेगळे करण्यात स्थानिक कारागीर तसेच पंढरपूरहून पोटासाठी आलेली कुटुंबे दिवस-रात्र मेहनत घेताना दिसत आहेत. गणरायाच्या आरती आणि भजनानंतर दिल्या जाणाºया प्रसादासाठी सफरचंद, केळी, चिबूड, काकडी, पेढे, लाडू, मोदक आदींची खरेदी चाकरमान्यांकडून सुरू होती.
 

Web Title: Ganpati Festival: markets to welcome Ganaraya, with the Kankavali crowd in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.