Ganpati Festival -सावंतवाडीची बाजारपेठ भाविकांच्या गर्दीने फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 04:24 PM2020-08-22T16:24:24+5:302020-08-22T16:27:25+5:30
सावंतवाडी शहरात गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तुडूंब गर्दी झाली होती. कोरोनाचे सावट असल्याने दरवर्षी मुख्य बाजारपेठेत भरविण्यात येणारा बाजार तलावाकाठी फुटपाथवर भरविण्यात आला होता. यामुळे खरेदी करताना भाविकांना सोयीचे झाल्याची भावना विक्रेते तसेच भाविक, नागरिकांमधून व्यक्त होत होती.
सावंतवाडी : शहरात गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तुडूंब गर्दी झाली होती. कोरोनाचे सावट असल्याने दरवर्षी मुख्य बाजारपेठेत भरविण्यात येणारा बाजार तलावाकाठी फुटपाथवर भरविण्यात आला होता. यामुळे खरेदी करताना भाविकांना सोयीचे झाल्याची भावना विक्रेते तसेच भाविक, नागरिकांमधून व्यक्त होत होती.
बाजार तलावाच्या काठावर भरल्याने बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना थोडीसी उसंत मिळत होती. दरम्यान, बाजारपेठेची नगराध्यक्ष संजू परब यांनी पाहणी करत व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच कोरोनाची भीती लक्षात घेता गर्दी टाळत सुरक्षितरित्या व्यवसाय करा असे सांगितले. तरी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सोशल डिस्टंसिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून आले.
सावंतवाडी नगरपालिकेकडून यावर्षी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भरवण्यात आलेल्या बाजारामध्ये काहीसा बदल करत होणारी गर्दी लक्षात घेता हा आठवडा बाजार शहरातील नारायण मंदिर ते सारस्वत बँक समोरील मोती तलावाच्या फुटपाथवर भरविण्याचे नियोजन करण्यात आले होते.
त्यादृष्टीने गुरुवारी सावंतवाडी बाजारपेठेत दाखल झालेल्या ग्रामीण भागातील महिला विक्रेत्यांसह फळ विक्रेते, भाजी विक्रेते, छोटे-मोठे इतर व्यावसायिक आधी सर्वांना पालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षी मुख्य बाजारपेठेत भरवण्यात येणारा हा बाजार आणि त्यामुळे होणारी गर्दी यावर्षी दिसून आली नाही. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन करताना चार चाकी वाहने आरपीडी हायस्कूल पटांगणात, तसेच दुचाकी वाहने आरोग्य भुवन ते भाट पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर व शहरात अन्य ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.
उपनराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, पाणीपुरवठा सभापती नासीर शेख, शिवसेनेच्या गटनेत्या नगरसेविका अनारोजीन लोबो नगरसेवक आनंद नेवगी यांच्यासह मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यासह पाहणी केली. तसेच व्यापाऱ्यांच्या व ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली होती.