सिंधुदुर्ग: कचरा प्रक्रिया प्रकल्प ही कणकवलीवासीयांची फसवणूकच : संदेश पारकर यांची टिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:51 PM2018-12-03T12:51:31+5:302018-12-03T12:53:38+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही 900 कोटींचा कचरा प्रक्रिया प्रकल्प नाही. निवडणुकांच्या तोंडावर ही निव्वळ कणकवलीवासीयांची फसवणूक केली जात आहे, अशी टीका भाजप नेते संदेश पारकर यांनी केली.
कणकवली : कणकवली शहर हे परमहंस भालचंद्र महाराजांची पुण्यभूमी आणि पूज्य अप्पासाहेब पटवर्धन यांची कर्मभूमी आहे. हे शहर घडविण्यासाठी अनेक कणकवलीकरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. असे असताना या ठिकाणी काहीजण कचरा केंद्र म्हणून कणकवलीची ओळख करण्याचा प्रयत्न करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही 900 कोटींचा कचरा प्रक्रिया प्रकल्प नाही. निवडणुकांच्या तोंडावर ही निव्वळ कणकवलीवासीयांची फसवणूक केली जात आहे, अशी टीका भाजप नेते संदेश पारकर यांनी केली.
कणकवलीतील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस अतुल रावराणे, तालुकाध्यक्ष संदेश सावंत - पटेल उपस्थित होते.
यावेळी संदेश पारकर म्हणाले, मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरामध्ये कचर्याचा मोठा प्रश्न आहे. अशा मोठ्या शहरामध्ये कुठेही 900 कोटी रूपये खर्च करून कचरा प्रकल्प सुरू झालेला नाही, असे असताना कणकवलीत असा प्रकल्प आणला जातोय असे सांगणे म्हणजे केवळ दिशाभूल आहे.
राणे कंपनीने आतापर्यंत जे जे प्रकल्प आणले त्यांचे काय झाले हे जनतेला चांगले ठाऊक आहे. आमदार नितेश राणे हे आपल्या प्रतिमेला साजेसे काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी 'औषध आपल्या दारी', ' रोजगार मेळावा', 'गडनदी पात्रात रिव्हर राफ्टींग', 'कुत्र्यांची नसबंदी' असे अनेक प्रकल्प आणल्याची घोषणा केली. मात्र ते कधी सुरू झाले कधी बंद पडले हेच कुणाला समजले नाही. त्यापैकीच हा कचरा प्रकल्प आहे.
हा केवळ निवडणुकीपुरता स्टंट आहे. एकीकडे नगरपंचायतीच्या बैठकीत कणकवली नगराध्यक्ष कचरा प्रकल्पाचा करार संबधित एजन्सी बरोबर झालेला नाही असे सांगतात, तर मग या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे भूमिपूजन झालेच कसे? जिल्हाधिकार्यांची याला परवानगी आहे का? असा सवालही पारकर यांनी केला. कणकवलीतील जनता सुज्ञ आहे, ते अशा फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीत, असा टोला संदेश पारकर यांनी यावेळी लगावला.
ते पुढे म्हणाले, या कचरा प्रक्रीया प्रकल्पाच्या माध्यमातून कणकवलीकरांची फसवणूक केली जात आहे. जिल्ह्यातील कचरा इथे आला आणि त्यावर प्रक्रिया न झाल्यास शहर कचराकेंद्र म्हणूनच ओळखले जाणार आहे. त्यामुळे कणकवलीतील नागरिकांचे जगणे मुश्किल होणार आहे. असेही संदेश पारकर यावेळी म्हणाले.
भाजपमुळेच अच्छे दिन आले !
'अच्छे दिन' आहेत कुठे? असा सवाल विश्वास यात्रांमध्ये खासदार नारायण राणे करत आहेत. राणेंच्या म्हणण्यानुसार लोकांना अच्छे दिन आले नसले तरीही राणेंना मात्र, भाजपमुळेच अच्छे दिन आले आहेत हे ते नाकारू शकणार नाहीत. भाजपने त्यांना खासदारकी दिली. जनतेचा विश्वास गमावलेले राणे आता विश्वास यात्रा काढत आहेत. मात्र, ही त्यांची समारोप यात्रा आहे, अशी टीका संदेश पारकर यांनी यावेळी केली.