गॅस एजन्सीच्या वाहन चालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 10:52 AM2019-11-16T10:52:25+5:302019-11-16T10:53:07+5:30
इंडेन गॅस एजन्सीचे वाहनचालक सतीश महादेव वेंगुर्लेकर (रा. वायरी भूतनाथ) यांना मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव याने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना चौके पेट्रोलपंपासमोरील हॉटेलात बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी वेंगुर्लेकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सांडव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवण : इंडेन गॅस एजन्सीचे वाहनचालक सतीश महादेव वेंगुर्लेकर (रा. वायरी भूतनाथ) यांना मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव याने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना चौके पेट्रोलपंपासमोरील हॉटेलात बुधवारी दुपारी घडली.
याप्रकरणी वेंगुर्लेकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सांडव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेंगुर्लेकर यांनी दिलेल्या तक्रारीत आपल्या खिशातील सुमारे ३६ हजारांची रक्कमही गहाळ झाल्याचे म्हटले आहे.
गॅस एजन्सीमध्ये कार्यरत वेंगुर्लेकर हे डिलिव्हरी वाहनावर चालक होते. नेहमीप्रमाणे ते गॅस सिलिंडर वितरित करून बुधवारी दुपारच्या सुमारास चौके पेट्रोलपंपासमोरील हॉटेलमध्ये गॅस सिलिंडर वितरित करण्यासाठी आले होते.
इंडेन एजन्सीचे दोन गॅस त्यांनी हॉटेलमधील महिला कामगाराकडे कार्डावर रितसर नोंद घालून दिले. यावेळी हॉटेल मालक विनोद सांडव यांनी हॉटेलमधून येऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर तेथीलच लाकडी दांड्याने मारहाण केली.
या मारहाणीदरम्यान वेंगुर्लेकर यांच्या खिशातील मोबाईल तसेच सिलिंडर विक्रीतून जमा असलेली ३६ हजार २८४ रुपये रक्कम गहाळ झाली. शोधाशोध केल्यावर मोबाईल मिळाला, मात्र रक्कम मिळाली नाही. याबाबत वेंगुर्लेकर यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार विनोद सांडव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.