शिवसेना उपनेतेपदी गौरीशंकर खोत यांची वर्णी, कोकणात शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:42 PM2022-06-29T12:42:14+5:302022-06-29T12:42:41+5:30
निवडणूक रणनीती आखण्यात मास्टरमाइंड ओळखले जाणारे खोत यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी देत सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद दिली आहे.
कणकवली : शिवसेनेचे आमदार व मंत्री बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा व कोकणात शिवसेनेची पकड कायम ठेवण्यासाठी शिवसेना उपनेतेपदी कणखर नेतृत्व असलेले गौरीशंकर खोत यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक रणनीती आखण्यात मास्टरमाइंड ओळखले जाणारे खोत यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी देत सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद दिली आहे.
गौरीशंकर खोत हे एकेकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय होते. राणेंच्या निवडणूक रणनीतीमध्ये विजयाची आखणी हुशारीने मांडण्याचे काम ते करायचे. कालांतराने पुन्हा खोत यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर त्यांच्यावर सिंधुदुर्ग- रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी कणकवली तालुक्यातील नांदगांव विकास सोसायटीच्या निवणुकीत भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडवत १३ ही जागांवर विजय मिळवला होता.
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेतील गौरीशंकर खोत यांच्याकडे उत्कृष्ट वक्ता, अभ्यासू वक्तृत्व, उत्तम संघटन कौशल्य, निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती असलेल्या गुणांमुळे असंख्य शिवसैनिकांचा पाठींबा आहे. आगामी निवणुकामध्ये खोत यांचा शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याची निवड जाहीर करण्यात आली आहे.
सावंतवाडी विधानसभेचे आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. आगामी काळात त्यांचा शिवसेनेला त्याचा संघटनेवर परिणाम होऊ नये, यासाठी मातोश्रीवरुन सूत्र हलवण्यात येत आहेत. गौरीशंकर खोत यांची थेट उपनेते पदी निवड करत सिंधुदुर्गात निष्ठावंत शिवसैनिकांना ताकद देण्याच्या दृष्टीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पावले उचलण्यात येत असल्याचे चित्र या निवडीतून दिसत आहे.