होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत गायत्री झाट्येला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:43 PM2020-05-18T17:43:51+5:302020-05-18T17:45:14+5:30
कणकवली : बृहन मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत मालवण येथील जय गणेश ...
कणकवली : बृहन मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत मालवण येथील जय गणेश हायस्कूलची सहावीतील विद्यार्थिनी गायत्री अमोल झाट्ये हीने सुवर्णपदक मिळविले आहे. तर कुडाळ हायस्कूलचा नववीतील विद्यार्थी प्रणव रघुनाथ कामत हा कास्य पदकाचा मानकरी ठरला आहे.
महाराष्ट्रात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या स्पर्धेतील सर्व टप्पे तिने कणकवली येथील युरेका सायन्स क्लबच्या सुषमा केणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार करत हे यश मिळविले आहे.
लेखी ,प्रात्यक्षिक ,प्रकल्प व मुलाखत या चार टप्प्यात सहावी व नववीतील विद्यार्थ्यांकरता ही स्पर्धा घेण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील ६४९८२ विद्यार्थी या स्पर्धे अंतर्गत लेखी परीक्षेत सहभागी झाले होते. लेखी परीक्षेतून साडेसात टक्के विद्यार्थी प्रात्यक्षिकासाठी पुणे येथे निवडण्यात आले होते. प्रात्यक्षिक परीक्षेतून १० टक्के विद्यार्थ्यांची प्रकल्प व मुलाखतीसाठी मुंबई येथे निवड झाली.
'प्रवाळ संवर्धन व संरक्षण ' हा विषय गायत्रीने प्रकल्पासाठी निवडला होता. मालवण शहरातील प्रवाळाचे महत्त्व विषद करत तिने समुद्र प्रवाळ हा केवळ सागरी पर्यावरणाच्या दृष्टीने नव्हे तर समग्र सृष्टीच्या दृष्टीने अमूल्य असा ठेवा आहे.
प्रवाळ टिकले तर मासेमारी, पर्यटन टिकेल . त्यावरच मालवण शहराच्या आर्थिक सुबत्तेला चालना मिळेल . याचा विचार करून प्रवाळ संवर्धनासाठी व जतनासाठी कसे प्रयत्न व्हावेत, प्रवाळाचे पर्यावरणातील महत्त्व, माशांसाठी प्रवाळ कसे महत्त्वाचे आहेत ,मालवण पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होण्यास पाण्याखालची प्रवाळ कशी कारणीभूत ठरतील हे तिने आपल्या प्रकल्पातून मांडले आहे.
प्रवाळ हे आपणास लाभलेली नैसर्गिक देणगी आहे . प्रवाळ पाहण्याचा आनंद घ्या आणि त्यांनाही छान पैकी जगू द्या असा संदेश देत तिने पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज ,संत राऊळ कॉलेज, स.का पाटील कॉलेज , विविध शाळा तसेच डॉ. अहमद अफरोज यांच्यासमोर सादरीकरण करून जनजागृती केली.
आपल्या या प्रकल्पाचे होमी भाभा रिसर्च सेंटर, टी आय एफ आर व इतर नामांकित इन्स्टिट्यूटच्या तज्ञ शास्त्रज्ञांसमोर उत्कृष्ट सादरीकरण करून सुवर्णपदक पटकावले. हा प्रकल्प करत असताना सारंग कुलकर्णी, युएनडीपीचे रोहित सावंत या तज्ञांची मुलाखत घेण्याची संधी तिला लाभली.
या प्रकल्पासाठी युरेका सायन्स क्लबच्या मार्गदर्शनाबरोबरच सिंधुदुर्ग वेटलँड ब्रीफ डॉक्युमेंटेशन कमिटीचे संदीप राणे, डॉ. गावडे ,सचिन देसाई, डॉ. कोळी , खान यांचेही बहुमोल सहकार्य मिळाले. तसेच आई-बाबा, शाळेतील शिक्षक यांचाही या यशात मोठा मोलाचा वाटा आहे. असे मनोगत गायत्रीने या यशानंतर व्यक्त केले आहे.