घनकचऱ्यातून वीज निर्मिती

By admin | Published: January 19, 2016 12:00 AM2016-01-19T00:00:16+5:302016-01-19T00:06:21+5:30

सरकारी जागेवर उद्याने फुलवणार : संजीवनी दळवी

Generation of electricity from solid waste | घनकचऱ्यातून वीज निर्मिती

घनकचऱ्यातून वीज निर्मिती

Next

दापोली शहरातील रस्त्याच्या कडेला फूटपाथला लागून अनधिकृत टपऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. फूटपाथवर बसून विक्री करायची व कचरा तेथेच टाकून निघून जायचे, ही प्रवृत्ती वाढू लागली आहे. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी व सरकारी जागेवरील बेकायदेशीर टपऱ्यांना आळा घालण्यासाठी दापोली नगरपंचायतीने सरकारी जागेवर फुलझाडे लावली आहेत. यामुळे शहरातील अतिक्रमणे न होता बगीच्यांमुळे शहर सुशोभित होईल. प्लास्टिक मुक्ती ते स्वच्छ सुंदर शहर या प्रवासाबाबत दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : दापोली शहरातील कचऱ्यावर नियंत्रण कसे मिळवले आहे?
उत्तर - दापोली शहरातील कचऱ्याची समस्या पूर्णपणे सुटली आहे. शहरातील प्लास्टिकचा कचरा १०० टक्के बंद झाल्याने दापोली हे प्लास्टिक मुक्त शहर बनले आहे. विघटन होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगॅसच्या माध्यमातून वीज निर्मितीचा प्रयत्न आहे. दापोली शहरात दररोज दोन टन ओला कचरा गोळा होतो. तसेच पाच टन सुका कचरा गोळा होतो. दोन्ही मिळून दिवसाला सरासरी ७ ते ९ टन कचरा गोळा होतो. या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. दापोली शहरातील सुका कचरा व ओला कचरा वेगळा केला जातो. ओला कचरा गोळा करून दररोज बायोगॅसमध्ये टाकला जातो. बायोगॅसमध्ये टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करुन शहरातील मच्छीमार्केट, सानेगुरुजी उद्यान या वीजनिर्मितीतून उजळणार आहे.
प्रश्न : शहर सुशोभिकरणासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत.
उत्तर - दापोली शहरातील सरकारी जागेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. सरकारी जागेमध्ये कचरा टाकणे, अतिक्रमण करणे, फूटपाथवर बसून पादचाऱ्यांना अडथळा करणे, रस्त्यावर दुकान थाटल्यानंतर कचरा टाकून घाण करणे, शहराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण करणारे बेकायदा फलक लावणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. या प्रकाराला आळा घालून शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी दापोली शहरातील सर्व फूटपाथ शेजारील व सरकारी जागेवर गार्डनिंगच्या माध्यमातून वेगवेगळी शोभेची व फुलांची झाडे लावून शहर सुशोभिकरणाचा प्रयत्न सुरु आहे.
प्रश्न : दापोली शहर १०० टक्के हागणदारीमुक्त शहर बनल्यानंतर दापोली शहर हिरवे बनवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत का?
उत्तर - दापोली शहर हागणदारीमुक्त शहर बनल्यानंतर दापोली शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे आमची जबाबदारी आहे. त्यामुळे शहर हद्दीत घाण करणाऱ्या व्यक्तिला जरब बसण्याकरिता एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. दंड मोहीम राबवण्यात येत असल्याचे बॅनर लावल्याने बाहेरुन येणाऱ्या व्यक्तिला माहिती होऊन शहर स्वच्छतेला हातभार लावला जातो.
प्रश्न : कचऱ्याचे विघटन कसे करता?
उत्तर - दापोली शहरातील कचरा दोन भागात वर्गीकृत केला जातो. त्यामुळे डंपिंग ग्राऊंडमध्ये जाणाऱ्या कचऱ्यात घट होऊ लागली आहे. कोंबडी कापल्यानंतर त्यांची पिसे नदी-नाल्यात टाकली जात होती. हा पिसांचा गोळा केलेला कचरा डंपिंग ग्राऊंडमध्ये टाकला असता त्याचे विघटन होत नसल्याचे आढळून आल्याने सध्या हा कचरा निसर्गऋण प्रकल्पासाठी वापरला जात आहे. या विशेष प्रकल्पामुळे आता या कचऱ्याचे विघटन होत आहे. ओला कचरा व कोंबड्यांच्या पिसांचा कचरा निसर्गऋण प्रकल्पासाठी वापरला जात असल्याने त्यापासून वीजनिर्मिती होऊ लागली आहे. सुका कचरा डंपिंग ग्राऊंडवर टाकून त्यावर प्रक्रिया केली जाते. काचेच्या बाटल्या, लोखंड, भंगार वेगळे केले जाते. सुक्या कचऱ्यातील भंगाराचे वर्गीकरण करुन भंगारवाल्यांना देऊन डंपिंग ग्राऊंडचा भार हलका होत आहे.
प्रश्न : स्वच्छ भारत मिशनला बळकटी कशी देत आहात?
उत्तर - सध्या स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात कुठेही उघड्यावर कचरा पडणार नही. शहरात कुठेही उघड्यावर शौच केले जाणार नाही.
गटारांचे सांडपाणी उघड्यावर येऊन रोगराई पसरणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे देशातील स्वच्छ भारत अभियानाचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दापोली शहर स्वच्छ व सुंदर शहर बनविणे हेच ध्येय असल्याने काही वेळा वाईटपणा घेऊनसुद्धा स्वच्छतेला महत्व देण्यात येत आहे.
- शिवाजी गोरे, दापोली

Web Title: Generation of electricity from solid waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.