भौगोलिक चमत्कार! सिंधुदुर्गात सापडला पाण्यावर तरंगणारा 'प्युमिस' दगड

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 7, 2023 12:57 PM2023-03-07T12:57:17+5:302023-03-07T12:57:40+5:30

काही ठिकाणी अशा दगडांना 'रामसेतुचा दगड' असेही लोकमानस मानते

Geographical wonders, Pumice stone floating on water found in Sindhudurga | भौगोलिक चमत्कार! सिंधुदुर्गात सापडला पाण्यावर तरंगणारा 'प्युमिस' दगड

भौगोलिक चमत्कार! सिंधुदुर्गात सापडला पाण्यावर तरंगणारा 'प्युमिस' दगड

googlenewsNext

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करीत असताना 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना पाण्यावर तरंगणारा 'प्युमिस' हा दगड सापडला आहे. ओरोस येथे वास्तव्याला असलेले जागतिक कीर्तीचे भुगर्भशास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभु यांनी या दगडाचे वर्णन 'दुर्मिळ आणि मी आतापर्यंत ज्याच्या शोधात होतो तो', अशा शब्दात केले आहे.

याबाबत माहिती देताना लळीत म्हणाले, आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणांना अनेक कारणांनी भेट देत असतो. अशाच एका भटकंतीत वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर आपणाला वजनाने हलकी व पाण्यावर तरंगणारी वस्तु आढळली. वरुन पाहिले असता ही वस्तु दगडासारखी आहे. पण ती सच्छिद्र आहे. प्रथमदर्शनी दगडासारखी दिसणारी, पण पाण्यावर तरंगणारी ही वस्तु नेमकी काय आहे, हे जाणुन घेण्यासाठी आपण भुगर्भशास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभु यांची भेट घेतली.

ही वस्तु पाहिल्यावर डॉ. प्रभु म्हणाले, हा 'प्युमिस' नावाचा दगड आहे. हा ज्वालामुखीजन्य सच्छिद्र खडक (व्हल्कॅनिक पोरस रॉक) आहे. हा आपल्या भागात अतिशय दुर्मिळ आहे. जेव्हा विशेषत: समुद्रात पाण्याखाली ज्वालामुखीचा विस्फोट होतो, तेव्हा पृथ्वीच्या अंतर्भागातून लाव्हारस प्रचंड वेगाने आकाशात उंच फेकला जातो. या लाव्ह्यामध्ये अनेक प्रकारचे वायु असतात. वर गेलेला हा लाव्हा जेव्हा खाली येऊ लागतो, तेव्हा तो घट्ट होण्याची प्रक्रिया लगेचच सुरु होते.

पाणी, कर्बवायु व अन्य वायुंचे विघटन, हवेचा दाब आणि अन्य बाबींमुळे हा लाव्हा घट्ट होऊन दगडात रुपांतरित होण्यापुर्वी त्यात असंख्य छिद्रे तयार होतात. त्यामुळे या दगडाच्या वस्तुमानात दगडाचे प्रमाण केवळ १० टक्के असते व आकारमानात ९० टक्के भाग हा पोकळ व छिद्रमय  असतो. यामुळे तो दिसायला मोठा असला तरी वजनाला हलका असतो आणि सच्छिद्र असल्याने पाण्यावर तरंगतो.

पाण्यावर तरंगणारा दगड हा एक भौगोलिक चमत्कार आहे. या प्रकारच्या दगडाला एक पौराणिक पार्श्वभुमीही आहे. रामायणातील एका प्रसंगात श्रीरामाने व त्याच्या वानरसेनेने रावणाच्या लंकेत जाण्यासाठी सेतू बांधला. यासाठी जे दगड वापरले ते पाण्यावर तरंगणारे होते, असा उल्लेख आहे. यामुळे काही ठिकाणी अशा दगडांना 'रामसेतुचा दगड' असेही लोकमानस मानते.

हा 'प्युमिस' दगड जगाच्या सर्व भागात विशेषत: समुद्रकिनारी आढळतो. इंडोनेशिया, जपान, न्युझीलंड, अफगाणिस्तान, सिरीया, इराण, रशिया, तुर्कस्तान, ग्रीस, इटली, हंगेरी, जर्मनी, आईसलँड, उत्तर व दक्षिण अमेरिका, केनिया, इथिओपिया, टांझानिया आदि देशांमध्ये हा दगड मोठ्या प्रमाणात सापडतो. तरंगणारा असल्याने समुद्राच्या पाण्यातील प्रवाहामुळे तो पाण्यातून प्रवासही करतो. ज्या भागात जागृत ज्वालामुखींचे प्रमाण मोठे आहे, अशा अनेक देशांमध्ये याचा वापर औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. याच्यात काही प्रमाणात औषधी द्रव्येही असतात. त्यामुळे चीनसारख्या देशात हजारो वर्षे त्याचा औषधी वापर होत आहे. आंघोळ करताना अंग घासण्यासाठीही याचा वापर होतो. आपल्या किनारपट्टीवर मात्र तो अभावानेच सापडतो.

Web Title: Geographical wonders, Pumice stone floating on water found in Sindhudurga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.