कसाल ग्रामपंचायतीला घेराव
By admin | Published: May 19, 2016 10:25 PM2016-05-19T22:25:41+5:302016-05-20T00:02:39+5:30
ग्रामस्थ आक्रमक : पाणीचोरी होत असल्याचा आरोप; पाणीपुरवठा सहा दिवस बंद
ओरोस : कसालला गेले सहा दिवस ग्रामपंचायतीमार्फत होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. मात्र, याचवेळी कसाल गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या नदीवरून पडवे येथील एका बांधकामाला पाणीपुरवठा होत असल्याचे उघड झाल्याने कसाल येथील ग्रामस्थ संतप्त झाले. या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीलाच गाठले. यावेळी सरपंच नीलिमा पारकर आणि ग्रामसेवकांना घेराव घातला. मात्र सरपंचांनी हा होत असलेला पाणी उपसा बेकायदेशीर असून आपण कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही, असे स्पष्ट करताच या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या उपशामुळे कसालला पाणी मिळत नसल्याचे मान्य केले. कसाल गाव हे मुंबई-गोवा महामार्गावर आणि जिल्हा मुख्यालयाजवळ आहे. या गावामध्ये चार ते साडेचार हजार लोकवस्ती आहे. या गावामध्ये सहा दिवस पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळा आणि पाणीटंचाईच्या तीव्र कालावधीत सहा दिवस पाणी नसल्याने येथील ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत.
कसाल बाजारपेठ, परबवाडी, ख्रिश्चनवाडी, नवाबाजार, वझरेवाडी, हुमरणेवाडी, मर्तलवाडी, हरिजनवाडी, पारकरवाडी आदी भागांमध्ये कसाल नदीवरून नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, गेले सहा दिवस
वाड्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. गेल्या सहा दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाणी सोडले नाही. नदीला पाणी नाही म्हणून पंप बंद केला आहे. हे पाणी निश्चित का
येत नाही, याचा शोध घेतल्यानंतर धक्कादायक माहिती उघड झाली.
या नदीवर नळपाणी योजनेला
पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणापासूनच सुमारे १०० ते १५० मीटरवर २५ हॉर्सपॉवर एवढ्या क्षमतेचा मोठा पंप बसविण्यात आला आहे.
या पंपाद्वारे पडवे येथील सुरू असलेल्या खासगी इमारतीला पाणीपुरवठा केला जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. हे हजारो लिटर पाणी वाया जात असताना कसाल ग्रामपंचायतीने या नळपाणी योजनेला का रोखले नाही? असा सवाल सरपंचांना विचारला असता याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे उत्तर त्यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी सरपंचांनी कुडाळ तहसीलदारांशी संपर्क साधला. ते बैठकीत असल्याने येऊ शकले नाहीत. मात्र, सरपंच यांच्यासह
अन्य सदस्यांनी ओरोस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करेपर्यंत सायंकाळी उशिरापर्यंत ग्रामस्थ थांबून होते आणि पुढील कार्यवाही सुरू होती.
यावेळी ग्रामस्थ प्रकाश नारकर, नवीन बांदेकर, संदीप पावसकर, अवधूत मालणकर, ग्रामपंचायत सदस्य नीलेश कामतेकर, विनिता कांदळकर, काका बांदेकर, रूपेश बांदेकर, गोविंद भिसे, नंदू आंबेरकर, अंकुश पाटकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
ग्रामपंचायतीकडून खासगी संस्थेस पत्र
याबाबत कसाल ग्रामस्थांनी सरपंच नीलिमा पारकर, ग्रामसेवक व्ही. जी. कोलते यांना जाब विचारला असता, या उपशासाठी किंवा हा पंप लावण्यासाठी परवानगी दिलेली नाही आणि आपल्याला याबाबत काहीही माहिती नाही, असे स्पष्ट केले. तसेच तिथे लावण्यात आलेल्या पंपातून पाणी उपसा होत असल्याचे लक्षात येताच ग्रामपंचायतीच्या वतीने खासगी संस्थेला पाणी उपसा थांबविण्याबाबत पत्र देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांची आक्रमक भूमिका
यावेळी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका पाहून सरपंचांसह सर्व सदस्यांनी कसाल नदी गाठत वस्तुस्थितीची पाहणी केली. या ठिकाणी थ्री फेज कमर्शिअल कनेक्शनसह मोठा जनरेटर
गाडीमध्ये ठेवण्यात आला आहे. या सर्व प्रकारची पाहणी करून पाण्याची मोठी चोरी होत असल्याचे सरपंच आणि इतर ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक होत यावर कारवाई झालीच पाहिजे, असा पवित्रा घेत ओरोस पोलिस ठाणे गाठले.
कसाल येथे सहा दिवस पिण्याचे पाणी न सोडल्याने ग्रामस्थांनी सरपंचांना जाब विचारला.