घुंगुरकाठी संस्थेतर्फे वडाचापाट कातकरी वस्तीवर साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 05:58 PM2021-06-03T17:58:15+5:302021-06-03T18:04:15+5:30
Tauktae Cyclone Help Sindhudurg : मालवण तालुक्यातील वडाचापाट धरण परिसरात राहणाऱ्या आदिवासी कातकरी समाजातील १४ कुटुंबांना घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ऊर्जा मुव्हमेंट यांच्यावतीने ३५ हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या आणि विकासापासून वंचित असलेल्या कातकरी बांधवांनी या मदतीबद्दल आनंद व्यक्त केला, अशी माहिती घुंगुरकाठीचे अध्यक्ष सतीश लळित यांनी दिली.
ओरोस : मालवण तालुक्यातील वडाचापाट धरण परिसरात राहणाऱ्या आदिवासी कातकरी समाजातील १४ कुटुंबांना घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ऊर्जा मुव्हमेंट यांच्यावतीने ३५ हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या आणि विकासापासून वंचित असलेल्या कातकरी बांधवांनी या मदतीबद्दल आनंद व्यक्त केला, अशी माहिती घुंगुरकाठीचे अध्यक्ष सतीश लळित यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देताना लळित म्हणाले की, तौक्ते वादळाचा फटका बसून वडाचा पाट धरण परिसरात गेल्या ४० वर्षांपासून राहणाऱ्या आदिवासी कातकरी समाजबांधवांच्या झोपड्या उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळाली. काल या वस्तीला भेट दिल्यावर झोपड्यांमध्ये पाणी गेल्याने धान्य व अन्य साहित्याचे नुकसान झाल्याचे निदर्शनाला आले. या पाहणीवेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा. श्रीधर पेडणेकर व प्रसाद जळवी उपस्थित होते.
वादळाला आठ दिवस उलटून गेल्यावरही या वस्तीवरील रहिवाशांना कोणतीही मदत मिळालेली नाही, असे लक्षात आल्यावर मुंबईतील ह्यऊर्जा मुव्हमेंटह्णचे निवृत्त नौदल अधिकारी कमांडर राजीव कुबल आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश सामंत यांना त्याची कल्पना दिली.
मालवण येथील टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलले कुबल व सामंत यांनी या कुटुंबांना मदत करण्याबाबत अनुकूलता दाखवली. त्यानुसार घुंगुरकाठीच्या माध्यमातून आज वडाचा पाट धरण परिसरात राहणाऱ्या १४ कातकरी कुटुंबांना प्रत्येकी रु. २५०० किमतीच्या एकूण ३५ हजार रुपयांच्या गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रत्येक किटमध्ये २५ किलो तांदूळ, कडधान्ये, मसाले, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, कांदे, बटाटे, साबण अशा प्रकारच्या वस्तूंचा समावेश होता. वस्तीवर झालेल्या एका छोट्याशा कार्यक्रमात या साहित्याचे वाटप करण्यात आले.
मदत पोहोचवता आली याचे समाधान : लळित
समाजातील ह्यनाही रेह्ण वर्गाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व ज्यांच्या अस्तित्वाची दखलही नाही, अशा आदिवासी कातकरी कुटुंबांना अल्पशी का होईना, मदत पोहोचवता आली याचे समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया सतीश लळित यांनी व्यक्त केली. आधुनिक जगात वावरणाऱ्या आणि विकासाची फळे चाखणाऱ्यांना या कातकरी बांधवांच्या दैन्याची कल्पनाही करता येणार नाही. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जवळ आला तरी विषमतेची दरी आपण सांधू शकलो नाही, याचा खेद आहे. मात्र त्याचबरोबर त्यांच्यापर्यंत पोचू शकलो, यांचा आनंद आहे, असे ते म्हणाले.